रशियाच्या शिलेदारासमोर भारताच्या गुकेशची 'बुद्धी', नेपोमनियाच्चीला रोखले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 07:39 AM2024-04-17T07:39:38+5:302024-04-17T07:41:02+5:30
भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत १०व्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाच्ची याला बरोबरीत रोखले.
टोरँटो : भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत १०व्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाच्ची याला बरोबरीत रोखले. या ड्राॅसह त्याने संयुक्त अव्वल स्थान कायम राखले आहे. भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या सामन्यात आर. प्रज्ञाननंदा आणि विदित गुजराती यांनीही गुणांची वाटणी केली, तर फॅबियानो कारूआनाने फिरोजा अलीरेजा आणि हिकारू नाकामुरा यांनी निजात अबासोव याला पराभूत केले. वर्षातील सर्वात महत्त्वाच्या या स्पर्धेच्या चार फेऱ्या अद्याप शिल्लक आहेत.
गुकेश आणि नेपोमनियाच्ची यांचे समान सहा-सहा गुण आहेत, तर प्रज्ञाननंदा, कारूआना आणि नाकामुरा अर्धा गुण मागे आहेत. गुजरातीचे सहा गुण आहेत. तो सहाव्या क्रमांकावरील एकमेव खेळाडू आहे. अलीरेझा ३.५ गुण आणि अबासोव दोन गुणांसह विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
नेपोमनियाच्ची काळ्या आणि पांढऱ्या मोहरांसह अधिक जोखीम घेत नाही. आपल्या मजबूत कामगिरीच्या जोरावर त्याला १० फेऱ्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. प्रज्ञानानंदलाही केवळ दुसऱ्या फेरीत गुकेशकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. हा त्याचा एकमेव पराभव होता.