प्रेक्षक स्टेडियममध्ये कधी येतील, हे सांगू शकत नाही-क्रीडामंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:59 AM2020-09-05T04:59:09+5:302020-09-05T04:59:37+5:30
माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतिया स्कूलने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना रिजिजू यांनी कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असून स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी परत येतील हे सांगणे कठीण झाले असल्याचे वक्तव्य केले.
नवी दिल्ली : ‘अनलॉक-४’च्या नियमावलीनुसार केंद्र शासनाने खेळासाठी १०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी बहाल केली असली तरीही स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी परत येऊ शकतील, याबाबत योग्य वेळ सांगण्यास क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी नकार दिला.
माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतिया स्कूलने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना रिजिजू यांनी कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असून स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी परत येतील हे सांगणे कठीण झाले असल्याचे वक्तव्य केले. भारतात ३९ लाखाच्या वर कोरोनाबाधित झाले आहेत.
ते म्हणाले, ‘मी स्टेडियममध्ये प्रेक्षक कधी परत येतील, याविषयी निर्णय घेऊ शकणार नाही. पुढील एक-दोन महिन्यात परिस्थिती कशी असेल हे माहीत नाही.’ गृहमंत्रालयाने २९ आॅगस्ट रोजी क्रीडा आयोजनासाठी १०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी बहाल केली. २१ सप्टेंबरपासून नवा नियम लागू होईल. नियमावलीनुसार चेहऱ्यावर मास्क लावून शारीरिक नियमाचे पालन करीत थर्मल स्कनिंग आणि हॅण्ड सॅनिटाईझ करणे अनिवार्य असणार आहे.
स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांवर अवलंबून असेल. राज्यांनी आपल्या क्षेत्रात सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशा गृहमंत्रालयाच्या सूचना आहेत.
२०२८ च्या आॅलिम्पिक पदकतालिकेत भारत अव्वल दहा स्थानांमध्ये असेल, असे भाकीत केल्यानंतर विविध स्तरातून टीका सहन करावी लागल्याची कबुली देत ते पुढे म्हणाले, ‘स्वप्न साकारण्यासाठी योजना आखाव्या लागतील आणि प्रत्यक्षात काम करावे लागेल.’ (वृत्तसंस्था)