आक्रमक फलंदाजीस सक्षम; परंतु चातुर्याने खेळतोय : युसूफ
By admin | Published: May 12, 2015 12:32 AM2015-05-12T00:32:33+5:302015-05-12T00:32:33+5:30
आयपीएलमध्ये या वेळेस केकेआरच्या डावाचा सूत्रधार म्हणून भूमिका पार पाडणारा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने, ‘‘मी आक्रमक फलंदाजीसाठी सक्षम आहे;
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये या वेळेस केकेआरच्या डावाचा सूत्रधार म्हणून भूमिका पार पाडणारा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने, ‘‘मी आक्रमक फलंदाजीसाठी सक्षम आहे; परंतु संघाच्या हितासाठी शैलीत बदल केला,’’ असे म्हटले आहे.
आतापर्यंत ११ सामन्यांत २१६ धावा फटकावणाऱ्या युसूफने आयपीएलच्या या पर्वामध्ये अनेकदा केकेआरसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. गेल्या वर्षी त्याने संघाच्या अंतिम फेरीतील विजयात मुख्य भूमिका बजावली होती;
परंतु युसूफ ‘टीम मॅन’च्या भूमिकेत खूष आहे.
युसूफ म्हणाला, ‘‘मी जाणीवपूर्वक खेळपट्टीवर टिकून खेळत आहे. मी अजूनही आक्रमक खेळू शकतो; परंतु आता मी समजदारीने खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. संघाच्या विजयात योगदान दिले जावे, यासाठी मी एकेरी-दुहेरी धावा घेऊन डाव पुढे नेत आहे. विजयात जास्त अडथळा येऊ नये, याकडे माझा प्रयत्न असतो. किंग्ज इलेव्हनविरुद्ध ज्या प्रकारे बाद झालो; त्यामुळे दु:खी झालो होतो. जर मी खेळपट्टीवर असतो, तर चांगल्या रीतीने जिंकलो असतो. मी आवश्यकता पडल्यास आक्रमक खेळणार आहे; परंतु परिस्थितीनुसार आपल्या शैलीतही बदल करणार आहे.’’ या नवीन बदलाचा निर्णय आपला स्वत:चा असल्याचे तो म्हणतो.
युसूफ म्हणाला, ‘‘शैली बदलण्याचा निर्णय माझा स्वत:चा होता. संघालादेखील माझा नैसर्गिक खेळ न बदलता नवीन शैली अवलंबायला हवी, असे वाटते. मलादेखील आक्रमक खेळून बाद होण्यापेक्षा चांगली फलंदाजी करून सहायकाची भूमिका पार पाडावी,
असे वाटले. त्याचा फायदाही मिळत आहे. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. संघाला मुसंडी मारून देण्यासाठी भागीदारी महत्त्वाची आहे.’’
या हंगामात आंद्रे रसेलने १९७.९३ च्या स्ट्राईक रेटने तीन अर्धशतकी खेळी केल्या. याविषयी युसूफ म्हणतो, ‘‘मी कधीतरी जी भूमिका बजावत
होतो, आता ती भूमिका आंद्रे पार
पाडत आहे. संकटप्रसंगी संघ त्याच्यावर अवलंबून असतो, ही चांगली बाब आहे.’’(वृत्तसंस्था)