संघाचे नशीब बदलण्याचा कर्णधार आमलाचा निर्धार

By admin | Published: November 24, 2015 12:20 AM2015-11-24T00:20:10+5:302015-11-24T00:20:10+5:30

व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये बुधवारपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमला स्वत:चे

Captain Amla's determination to change the fortunes of the team | संघाचे नशीब बदलण्याचा कर्णधार आमलाचा निर्धार

संघाचे नशीब बदलण्याचा कर्णधार आमलाचा निर्धार

Next

नागपूर : व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये बुधवारपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमला स्वत:चे व संघाचे नशीब बदलण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार आमला म्हणाला, ‘आम्ही यापूर्वीही अशी कामगिरी केली आहे. मालिकेचे अद्याप दोन सामने शिल्लक असून, चुरस कायम आहे. येथील खेळपट्टीवर नक्कीच अनुकूल निकाल मिळेल.’
आमला पुढे म्हणाला, ‘आमच्या संघातील अनेक खेळाडू प्रथमच भारताचा दौरा करीत आहेत. सर्व खेळाडूंना पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये बरेच काही शिकायला मिळाले आहे.’
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केवळ तीन दिवसांमध्ये १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसरी कसोटी पावसामुळे वाया गेली.
पाच वर्षांपूर्वी जामठा स्टेडियममध्ये नाबाद २५३ धावांची खेळी करणाऱ्या आमलाला या दौऱ्यात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत (४३ व ० ) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेला आमला दुसऱ्या कसोटी सामन्यात केवळ ७ धावा काढून माघारी परतला. भारतात यापूर्वी आमलाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. या मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या सहा कसोटी सामन्यांत त्याने १०२.८ च्या सरासरीने ८२३ धावा फटकावल्या आहेत. त्यात चार शतकी खेळींचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिका संघात दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज वेर्नोन फिलँडरच्या स्थानी केली एबोटला स्थान देण्यात आलेले आहे, तर स्टेनला पर्याय म्हणून मर्चेंट डि लांगेला पाचारण करण्यात आले आहे.
संघाचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो म्हणाले, ‘सध्या आमच्याकडे मोर्न मोर्कल, कॅगिसो रबादा आणि एबोट हे तीन फिट वेगवान गोलंदाज आहेत. या तीनपैकी एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाली तर पर्यायी व्यवस्थेसाठी आम्ही सज्ज आहोत.’
दक्षिण आफ्रिका संघ कसोटी मालिकेल रविचंद्रन अश्विन व रवींंद्र जडेजा या भारतीय फिरकीपटूंच्या आव्हानाला सामोरे जाण्यात अपयशी ठरला आहे. या दोघांनी तीन डावांमध्ये ३० पैकी २४ बळी घेतले आहेत. पाहुण्या संघातर्फे केवळ एबी डिव्हिलियर्सला भारतीय गोलंदाजांना समर्थपणे सामोरे जाता आले. डिव्हिलियर्सने पहिल्या कसोटी सामन्यात ६३ व बंगलोरमध्ये कारकिर्दीतील १०० व्या कसोटीत ८५ धावांची खेळी केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Captain Amla's determination to change the fortunes of the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.