कर्णधार बेलीवर एका सामन्याची बंदी
By admin | Published: January 20, 2015 12:22 AM2015-01-20T00:22:06+5:302015-01-20T00:22:06+5:30
तिरंगी मालिकेतील भारताविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात कूर्मगती गोलंदाजी केल्याबद्दल आॅस्ट्रेलियाचा वन डे कर्णधार जॉर्ज बेली याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
मेलबोर्न : तिरंगी मालिकेतील भारताविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात कूर्मगती गोलंदाजी केल्याबद्दल आॅस्ट्रेलियाचा वन डे कर्णधार जॉर्ज बेली याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे २३ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.
आयसीसीने बेलीवर बंदी घातल्यामुळे इंग्लंडविरुद्ध सामन्यात स्टीव्हन स्मिथ आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकतो. बेलीला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलेच; शिवाय त्याच्याकडून सामना शुल्काच्या २० टक्के रकमेचा दंडही आकारण्यात आला. संघातील अन्य खेळाडूंवर १० टक्के रकमेचा दंड लावण्यात आला आहे. बेलीने स्वत:ची चूक मान्य केल्यामुळे पुढील सुनावणी टळली. बेलीचे हे निलंबन आॅस्ट्रेलियासाठी विश्वचषकाच्या दृष्टीने लाभदायी मानले जाते. यानंतर त्याच्यावर बंदीची टांगती तलवार राहणार नाही. मायकेल क्लार्क जखमी असल्याने विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात बेली आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल.
भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाने ५० षटके टाकण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा २६ मिनिटे अधिक घेतली. आयसीसीने सप्टेंबरमध्ये ताकीद देताना म्हटले होते, की बेली किंवा द. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स हे येत्या वर्षभरात कूर्मगती गोलंदाजीत दोषी आढळले, तर सामना शुल्कातील रकमेचा दंड आणि एका सामन्याची बंदी लावली जाईल. बेली यात अलगद अडकला. (वृत्तसंस्था)