कॅप्टन कूल धोनीची सटकली, बांगलादेशच्या गोलंदाजाला दिला धक्का
By admin | Published: June 19, 2015 11:16 AM2015-06-19T11:16:33+5:302015-06-19T13:13:36+5:30
मैदानावर शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंह धोनीने बांगलादेशविरुद्धच्या धाव घेत असताना मध्ये आलेल्या गोलंदाजांला जोरात धक्का दिल्याचे समोर आले आहे.
ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. १९ - मैदानावर शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजाला धक्का दिला. धोनी धाव घेत असताना गोलंदाजमध्ये आला व यादरम्यान धोनीने त्याला जोरात धक्का दिला.
गुरुवारी बांगलादेशने भारताचा पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. या पराभवासोबतच गुरुवारी चर्चा रंगली ती धोनीच्या धक्क्याची. ३७ व्या षटकात डावखुरा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान हा धोनी एकेरी धाव घेत असताना त्याच्या मध्ये आला. या दरम्यान धोनीने त्याचा धावण्याचा मार्ग न बदलता रहमानला धक्का देऊन धाव पूर्ण केली. धोनीच्या धक्क्याने मुस्तफिजूरला दुखापत झाली व त्याला षटक अर्धवट सोडून बाहेर जावे लागले. मुस्तफिजूरचे षटक दुस-या गोलंदाजांने पूर्ण केले. स्लो मोशनमधील व्हिडीओत धोनीने मुस्तफिजूरला धक्का दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. यानंतर बांगलादेश संघाच्या अन्य खेळाडूंनी धोनीविरोधात पंचाकडे तक्रारही केली. पंचांनी धोनीला ताकिद दिली आहे. आता सामनाधिकारी धोनीवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.