करिअरचा ‘बास्केट’...

By admin | Published: August 16, 2015 01:40 AM2015-08-16T01:40:01+5:302015-08-16T01:40:01+5:30

उंचपुरे खेळाडू आणि चेंडूला बास्केटमध्ये टाकण्यासाठी त्यांच्यामध्ये चाललेली चढाओढ... असा हा रोमांचक खेळ बास्केटबॉल तरुणाईला खूप आकर्षित करतो. बास्केटबॉल खेळण्यासाठी शारीरिक

Career's 'basket' ... | करिअरचा ‘बास्केट’...

करिअरचा ‘बास्केट’...

Next

- रोहित नाईक

उंचपुरे खेळाडू आणि चेंडूला बास्केटमध्ये टाकण्यासाठी त्यांच्यामध्ये चाललेली चढाओढ... असा हा रोमांचक खेळ बास्केटबॉल तरुणाईला खूप आकर्षित करतो. बास्केटबॉल खेळण्यासाठी शारीरिक उंची असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात असले तरी, कल्पकता व चपळता असेल तर कमी उंचीचे खेळाडूदेखील या खेळामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतात. मुंबईतदेखील बास्केटबॉलचे अनेक क्लब्स, संस्था असून, त्याद्वारे वर्षभर विविध स्पर्धा, शिबिरे आयोजित होत असतात. शालेय स्तरापासून ते थेट कॉर्पाेरेट स्तरावरील अनेक स्पर्धा बास्केटबॉलप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी खेचत असतात.
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अंतर्गत मुंबईमध्ये मुंबई नॉर्थ, मुंबई साऊथ ईस्ट, मुंबई साऊथ वेस्ट आणि मुंबई सेंट्रल अशा चार मुख्य विभागांमध्ये बास्केटबॉलचे विभाजन करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे विभागासाठी स्वतंत्र ठाणे विभाग असून, आता नव्या पालघर जिल्ह्यासाठीही नवीन विभाग सुरू होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईमध्ये बास्केटबॉल स्पर्धा किंवा या खेळाविषयीचे उपक्रम प्रामुख्याने यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वायएमसीए) आणि मुंबईतील विविध क्लब्स यांच्या माध्यमातून आयोजित होत असतात.
मुंबईमध्ये वायएमसीएच्या अंधेरी, वांद्रा, बोरीवली, सेंट्रल - कुलाबा, चेंबूर, घाटकोपर आणि नवी मुंबई यांसारख्या विविध विभागांतर्गत बास्केटबॉलचे उपक्रम राबविण्यात येतात. तसेच सुमारे ५०हून अधिक स्वतंत्र बास्केटबॉल क्लब मुंबईमध्ये असून, त्यापैकी ३०हून अधिक सक्रिय आहेत. या क्लब्सद्वारे व वायएमसीच्या विविध विभागांतर्फे वर्षभर बास्केटबॉलच्या स्पर्धांचे आयोजन होत असते. एका स्पर्धेमध्ये साधारणपणे मुंबईतील जवळपास २५-३० क्लब्स सहभागी होत असल्याने बास्केटबॉल खेळाडूंना आपली चमक दाखवण्यास खूप वाव मिळतो.
शालेय स्तरावरही बास्केटबॉलच्या अनेक स्पर्धा होत असतात. त्या जिल्हा क्रीडा कार्यालय (डीएसओ) आणि मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या (एमएसएसए) वतीने आयोजित होतात. या स्पर्धांतून खेळाडूंना विविध स्पर्धांत्मक खेळांचा अनुभव मिळतो. शिवाय ज्या शाळांमध्ये बास्केटबॉल खेळला जात नाही अशा खेळाडूंसाठी खेळातील क्लब संस्कृतीमुळे स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहेच.

खेळाडूंना संधी...
बास्केटबॉलच्या विविध स्थानिक स्पर्धांपासूनच खेळाडूंना अनेक संधी उपलब्ध होतात. स्थानिक स्पर्धांतील चमकदार खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मुंबईच्या नॉर्थ, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि सेंट्रल या संघांमध्ये निवड होते. यानंतर त्या खेळाडूंना राज्याच्या संघात निवड होण्याची संधी मिळते. राज्याच्या संघात चमक दाखवल्यानंतर खेळाडूंची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड होऊन त्यातील उत्कृष्ट खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. दखल घेण्याची बाब म्हणजे सध्या प्रत्येक खेळामध्ये लीग स्पर्धा सुरू असून, मुंबईतदेखील बास्केटबॉल लीग स्पर्धा आयोजित करण्याचा संघटनेचा विचार सुरू आहे. तसेच राज्य संघटना शालेय स्तरावर लीग स्पर्धा घेण्याच्या प्रयत्नात असल्याने भविष्यात खेळाडूंसाठी मोठ्या संधी उपलब्ध असतील.

नोकरीच्या संधी...
इतर खेळांप्रमाणे बास्केटबॉल खेळाडूंसाठी विविध कॉर्पोरेट्स टीममधून खेळण्याची व नोकरी करण्याची संधी उपलब्ध आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्मी - पुणे, भारतीय नौदल, मध्य रेल्वे, सेंट्रल एक्साइज अ‍ॅण्ड कस्टम्स आणि मुंबई व महाराष्ट्र पोलीस यांचा समावेश आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांतून या अव्वल संघातून खेळताना अनेक गुणवान खेळाडूंची वर्णी राष्ट्रीय संघातदेखील लागते.

मुंबईतील महत्त्वाच्या स्पर्धा...
सातत्याने अनेक स्पर्धा मुंबईमध्ये वायएमसीए व विविध क्लब्सच्या माध्यमातून होत असतात. परंतु आॅल इंडिया रामू स्मृती चषक आणि सॅव्हीओ क्लब अजिंक्यपद या दोन स्पर्धा चांगल्याच गाजतात. या दोन्ही स्पर्धांमध्ये देशातील अव्वल संघ सहभागी होत असल्याने या वेळी उच्च दर्जाचा खेळ पाहण्याची संधी बास्केटबॉलप्रेमींना मिळते. त्यातही सॅव्हीओ चषक स्पर्धेत किमान दोन परदेशी संघांनादेखील आमंत्रित केले जात असल्याने मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय खेळाचादेखील अनुभव मिळतो. याव्यतिरिक्त अनेक राज्यस्तरीय स्पर्धा आणि वायएमसीच्या ओपन टुर्नामेंटदेखील मुंबईकरांमध्ये लोकप्रिय आहेत.

Web Title: Career's 'basket' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.