कॅरम : येश, गणेश, दिव्या वाडकर, हर्षाली, विमल यांना विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:10 PM2019-09-25T23:10:59+5:302019-09-25T23:11:25+5:30
या स्पर्धेला मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातून २०० स्पर्धकांचा उस्फूर्त सहभाग मिळाला.
मुंबई : वल्लभदास डागरा इंडियन सोसायटीच्या विद्यमाने आयोजित मानाची व प्रतिष्ठेची प्रथम डॉ. ए. वि. मेहता स्मरणार्थ मंदबुद्धी मुलांसाठी कॅरम स्पर्धेच्या मुली व मुले एकेरीच्या विविध आठ गटांतील विजेते अनुक्रमे गुलबशन शेख, दिव्या वाडकर (लायन्स जुहू सेंटर), हर्षाली, विमल (एम. डी. सी. होम) जयेश तांडेल (सवेरा स्पेशल स्कूल), एन. के. महेश (एम. डी. सी. होम), गणेश वर्मा (स्वामी परिजनाश्रम स्पेशल स्कूल), हमजा शेख (सेव द चिल्ड्रन) यांनी विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा गुणवंतीबेन जयदेव चौधरी क्रिडा केंद्र, लॅण्डमार्क हॉटेल, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई येथे खेळविण्यात आली. या स्पर्धेला मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातून २०० स्पर्धकांचा उस्फूर्त सहभाग मिळाला.
मुले एकेरीच्या (२२ वर्षांवरील) गटाच्या अंतीम फेरीच्या सरळ दोन गेम रंगलेल्या लढतीत सवेरा स्पेशल स्कूलच्या जयेश तांडेलने पुनर्वसु स्पेशल स्कूलच्या अभिमन्यू देसाईचा २५-३, २५-१ असा सहज पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात एम. डी. सी. होमच्या एन. के. निलेशने सरळ दोन गेममध्ये के. के. व्होकेशनल रिहाबिलेटेशन सेंटरच्या अनिल अय्यरचा २५-९, २५-१० असा पराभव केला.
मुले एकेरीच्या (१६ ते २१ वर्ष) गटातील अंतीम फेरीच्या सामन्यात एम. डी. सी. होमच्या एन. के. महेशने सरळ दोन गेममध्ये वासरीबाई डागरा इंडियन सोसायटीच्या देवांग पुणेकरला २५-११, २५-९ असे नमवून विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात वासरीबाई डागरा इंडियन सोसायटीच्या निखिल कांबळेने एकतर्फी झालेल्या दोन गेममध्ये सवेरा स्पेशल स्कूलच्या हर्षल बागडेला २५-१, २५-३ असे नमविले.
मुले एकेरीच्या (१२ ते १५ वर्ष) गटातील अंतीम फेरीच्या सामन्यात स्वामी परिजनाश्रम स्पेशल स्कूलच्या गणेश वर्माने दोन गेम रंगलेल्या लढतीत अंजा स्पेशल स्कूलच्या रियाज नागोरीचा २५-११, २५-१२ असे नमवून विजेतेपद पटकावत आपले नाव कोरले. सदाफुली स्पेशल स्कूलच्या मोहित चौधरीने सरळ दोन गेममध्ये आश्रय स्पेशल स्कूलच्या अर्षद शेखचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवित तिसरा क्रमांक पटकाविला.
मुले एकेरीच्या (८ ते ११ वर्ष) गटातील अंतीम फेरीच्या सामन्यात सेव द चिल्ड्रनच्या हमजा शेखने सहज दोन गेममध्ये अंजा स्पेशल स्कूलच्या रोहन गुप्ताला २५-९, २५-१० असे नमवून आपले वर्चस्व सिद्ध करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. वासरीबाई डागरा इंडियन सोसायटीच्या जस्टिन राज चेट्टीने दोन गेम रंगलेल्या लढतीत सदाफुली स्पेशल स्कूलच्या अंकीत चौरसियाला २५-१, २५-२ असे नमवित तिसरा प्रमांक पटकाविला.
मुली एकेरीच्या (२२ वर्षांवरील) गटाच्या अंतीम फेरीच्या दोन गेम रंगलेल्या लढतीत एम. डी. सी. होमच्या विमलने २५-६, २५-५ असा एम. डी. सी. होमच्याच ज्योति शर्माचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात एम. डी. सी. होमच्या मारिया केशवाने सरळ दोन गेममध्ये एम. डी. सी. होमच्याच प्रविणा बरकतला २५-३, २५-१० असे नमविले.
मुली एकेरीच्या (१६ ते २१ वर्ष) गटातील अंतीम फेरीच्या सामन्यात एम. डी. सी. होमच्या हर्षालीने दोन गेम रंगलेल्या लढतीत अंजा स्पेशल स्कूलच्या हिबा कादरीला २५-९, २५-१० असे नमवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात शिशुकल्याण केंद्राच्या प्राजक्ता मोहितेने सरळ दोन गेममध्ये एम. डी. सी. होमच्या मारिया शेखचा २५-३, २५-१० असा पराभव केला.
मुली एकेरीच्या (१२ ते १५ वर्ष) गटातील अंतीम फेरीच्या सामन्यात लायन्स जुहू सेंटरच्या दिव्या वाडकरने तीन गेम रंगलेल्या लढतीत सेव्ह द चिल्ड्रनच्या महेका शेखवर २५-१, ०-२५, २५-२ असा निसटता विजय मिळवित विजेतेपद पटकाविले. सुर्योदय स्पेशल स्कूलच्या अनुप्रिया राजभोरने सरळ दोन गेममध्ये सवेरा स्पेशल स्कूलच्या फाल्गुनी सुर्वेला २५-९, २५-३ असे नमवित तिसरा क्रमांक पटकाविला.
मुली एकेरीच्या (८ ते ११ वर्ष) गटातील अंतीम फेरीच्या सामन्यात लायन्स जुहू सेंटरच्या गुलबशन शेखने सहज दोन गेममध्ये वासरीबाई डागरा इंडियन सोसायटीच्या कुशी यादवला २५-३, २५-२ असे पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. लायन्स जुहू सेंटरच्या अन्वित कौर ढिल्लोने दोन गेम रंगलेल्या लढतीत लायन्स जुहू सेंटरच्याच दिपाली पवारला २५-३, २५-७ असे नमवित तिसरा क्रमांक पटकाविला.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये एकाच वेळी १२ मान्यताप्राप्त प्रिसाईज एलिगेन्ट कॅरम बोर्डस्, प्रिसाईज स्टँडस् आणि प्रिसाईज कॅरम सोंगट्या वापऱण्यात आल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच अमोल शिंदे व तांत्रिक संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच श्री. जनार्धन संगम यांनी उत्तम नियोजन केले.