कॅरम अकादमीसाठी 15 ऑगस्टचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:42 PM2018-08-14T18:42:11+5:302018-08-14T18:43:22+5:30
10-18 या वयोगटांतील मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण या अकादमीच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला कॅरमपटू संगीता चांदोरकर यांनी कॅरम अकादमी सुरु करण्याचे ठरवले आहे. या अकादमीसाठी त्यांनी मुहूर्त निवडला आहे तो 15 ऑगस्टचा. ही अकादमी मुंबईतील नायगाव परीसरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात सुरु करण्यात येणार आहे. या अकादमीच्या माध्यमातून युवा पीढी घडवायची आहे. त्यामुळे 10-18 या वयोगटांतील मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण या अकादमीच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
कॅरम हा खेळ फक्त टाईमपाससाठी खेळला जातो, अशी काही जणांनी भावना होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये कॅरममध्येही कारकिर्द घडवता येऊ शकते, हे सर्वांना समजले आहे. पण सध्याच्या घडीला कॅरमच्या फारशा अकादमी दिसत नाही. कॅरमचे तंत्रशुद्ध शिक्षण कुठे मिळेल, याचा शोध युवा वर्ग घेत असला तरी त्यांना समाधनकारक उत्तर मिळत नाही. त्यासाठीच या अकादमीची स्थापना करण्यात आली आहे.
संगीता यांनी जागतिक उपविजेतेपद, राष्ट्रीय जेतेपद आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेत दोनदा उपविजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर पाचवेळा महाराष्ट्र राज्य विजेतेपद आणि तीन वेळा मुंबई जिल्हा विजेतेपद पटकावले आहे. आतापर्यंत जवळपास 350 राज्य आणि विविध स्पर्धांचे जेतेपद संगीता यांच्याकडे आहे.