कॅरम : अमोल, योगेश, सलमान, मयूर यांची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 08:17 PM2020-02-12T20:17:24+5:302020-02-12T20:18:28+5:30
रिझर्व्ह बँकेच्या हिदायत अन्सारीचा २५-१४, ५-१४ असा फाडशा पाडत स्पर्धेत मोठी खळबळ माजवत तिसरी फेरी गाठली.
मुंबई : बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अमोल सावर्डेकरने सरळ दोन गेममध्ये माजी सार्क व एशिआई कॅरम विजेता रिझर्व्ह बँकेच्या हिदायत अन्सारीचा २५-१४, ५-१४ असा फाडशा पाडत स्पर्धेत मोठी खळबळ माजवत तिसरी फेरी गाठली.
दुसऱ्या एका तीन गेम रंगलेल्या सामन्यात वरळी स्पोर्टस क्लबच्या सलमान खानने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू ओमकार नेटकेचा २१-२५, २५-११, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढली. दुसऱ्या एका तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत ए. के. फाऊंडेशनच्या अमोल चरकरीने बोरिचा स्पोर्टस् क्लबच्या नटवर राठोडला २५-८, १८-२५, २५-१६ असे निष्प्रभ करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष श्री. शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस श्री. पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस श्री. भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले आहे.
जैन इरिगेशनचा माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेने एकतर्फी सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शांतिलाल जितियाचा २५-१, २५-४ असा फाडशा पाडत विजयी कूच केली. बोरिचा स्पोर्टस् क्लबच्या मयूर शिशुपालने दोन गेम रंगलेल्या लढतीत वायएमसीएच्या मोहम्मद अतानियावर २५-१३, २५-१७ असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजेश खेडेकरने बेस्टच्या सुधीर कांबळेवर २५-०, २५-० असा सहज विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. वायएमसीएच्या मोहम्मद सलिमने सरळ दोन गेममध्ये माजी राष्ट्रीय युवा विजेता सुरज कुंभारचा २५-१८, २५-८ असा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
या स्पर्धेत आतापर्यंत ३ ब्रेक टू फिनिश आणि २ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे.