कॅरम : सचिन, राजेश, विशाल यांची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 11:01 PM2019-07-16T23:01:26+5:302019-07-16T23:02:13+5:30
सचिन पवारने नालासोपाऱ्याच्या विनोद परमारची ५-२५, २५-७, २५-१३ अशी कडवी झुंज मोडीत काढत उप-उपांत्य फेरी गाठली.
विरार : पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनतर्फे आयोजित प्रतिष्ठेच्या पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उप-उपांत्य पूर्व फेरीत तीन गेम रंगलेल्या सामान्यात अग्रमानांकित यंगस्टार्स ट्रस्टच्या सचिन पवारने नालासोपाऱ्याच्या विनोद परमारची ५-२५, २५-७, २५-१३ अशी कडवी झुंज मोडीत काढत उप-उपांत्य फेरी गाठली. तसेच दुसऱ्या एका सामन्यात माजी पालघर जिल्हा विजेता राजेश मेहताने यंगस्टार्स ट्रस्टच्या शशांक शिरोडकरचा २५-११, ११-२५, २५-१७ असा उत्कंठापूर्ण तीन गेम रंगलेल्या लढतीत नमवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ही प्रतिष्ठित अजिंक्यपद स्पर्धा कै. भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक भवन, विरार (पश्चिम), जिल्हा पालघर येथे खेळविण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन लोकनेते विधायक मा. हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. जितूभाई शहा-अध्यक्ष, श्री. पंकज ठाकूर-कार्याध्यक्ष, श्री. राजेश रोडे-कार्यवाह, पालघर डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांनी अत्यंत नीट आणि नेटक्या पद्धतीने केले आहे.
प्रौढ गटाच्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात सफाळ्याच्या अग्रमानांकित नवीन पाटीलने यंगस्टार्स ट्रस्टच्या उदय जाधवला २५-०, २५-० असे नमवून आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकुश बायजेने यंगस्टार्स ट्रस्टच्याच रमेश वाघमारेवर २५-२०, २५-१० अशी सरळ दोन गेममध्ये मात करत आगेकूच केली. वसई क्रिडा मंडळच्या दुसऱ्या मानांकित गणेश फडकेने दोन गेम रंगलेल्या लढतीत विरारच्या यंगस्टार्स ट्रस्टच्या संदेश मांजळकरचा २५-१०, २५-२१ असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून उपांत्य फेरी गाठली. यंगस्टार्स ट्रस्टच्या दत्तू गड्डमने दोन गेम रंगलेल्या लढतीत विरारच्या प्रदिप कोलबेकरला २५-१०, २५-९ असे नमवून आगेकूच केली.
पुरुष एकेरीच्या उप-उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात सातव्या मानांकित यंगस्टार्स ट्रस्टच्या बिपीन पांडेने दोन गेम रंगलेल्या लढतीत वसईच्या अनुभवी गणेश फडकेचा २५-४, २५-९ असा फाडशा पाडत आगेकूच केली. दुसरा मानांकित आशुतोष गिरीने वसईच्या संतोष पालवणकरची २५-१३, २५-१३ अशी झुंज मोडीत काढत उप-उपांत्य फेरी गाठली. यंगस्टार्स ट्रस्टच्या नवोदित विशाल सोनावणेने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत नालासोपाऱ्याच्या गणेश यादवचा २५-१४, २५-१७ असा पराभव करत आगेकूच केली. चौथा मानांकित यंगस्टार्स ट्रस्टच्या विश्वनाथ देवरूखकरने दोन गेम रंगलेल्या लढतीत ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या नालासोपाऱ्याच्या नरेश कोळीचा २५-१४, २५-१३ असा धुव्वा उडवित् आगेकूच कायम ठेवली. यंगस्टार्स ट्रस्टच्या महेश रायकरने सरळ दोन गेममध्ये सफाळ्याच्या नवीन पाटीलचा २५-१०, २५-१६ असा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले. तिसरा मानांकित नालासोपाऱ्याच्या शरीफ शेखने एकतर्फी लढतीत वसईच्या सुरेश वाणियाचा २५-१, २५-७ असा पराभव करून उप-उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली कंबर कसली असून अध्यक्ष जितूभाई शहा, कार्याध्यक्ष पंकज ठाकूर, मानद महासचिव राजेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिल बांदिवडेकर उपाध्यक्ष, सहसचिव प्रकाश मांजरेकर, लक्ष्मण बारिया, दत्तात्रय कदम आणि इतर कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.
आत्तापर्यंत स्पर्धेत तीन ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे.