नरसिंग डोप प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
By admin | Published: September 17, 2016 05:02 AM2016-09-17T05:02:00+5:302016-09-17T05:02:00+5:30
सीबीआयने पहिलवान नरसिंग यादवच्या डोपिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयवर सोपविला होता
नवी दिल्ली : सीबीआयने पहिलवान नरसिंग यादवच्या डोपिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयवर सोपविला होता, असे भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) शुक्रवारी सांगितले.
डब्ल्यूएफआय अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि नरसिंग प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावा, असा आग्रह त्यांनी केला होता.
ब्रिजभूषण यांनी सांगितले, ‘पंतप्रधान कार्यालयाने नरसिंगसंबंधीचा पुढील तपास सीबीआयवर सोपवले आहे आणि प्राप्त माहितीनुसार नरसिंगच्या डोपिंगविषयी कारवाई सुरू करण्यात आली आहे.’ क्रीडा लवादांनी गेल्या महिन्यात नरसिंगला आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून बंदी केली होती. याशिवाय त्याच्यावर चार वर्षांची बंदीही लादली होती. त्यामुळे त्याचे कारकीर्द धोक्यात सापडली आहे. तेव्हापासून डब्ल्यूएफआय या प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे करण्यात यावा, अशी मागणी करीत आहे.
आॅलिम्पिकला सुरुवात होण्याच्या जवळपास २0 दिवसांआधी नरसिंगने बंदी असलेला पदार्थ घेतल्यामुळे उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळला होता. त्यानंतर नरसिंगने त्याच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता. आहार व सेवनाच्या द्रव्यासोबत छेडछाड केली गेली असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
तथापि, नरसिंग याविषयी वास्तविक पुरावे सादर करू शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या या पहिलवानाला रिओ आॅलिम्पिकच्या पुरुषांच्या ७४ किलो फ्री स्टाईल वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. नरसिंगच्या लढतीच्या फक्त तीन दिवस आधीच वाडाने त्याला दिलेल्या क्लीन चिटविरुद्ध क्रीडा लवादात आव्हान दिले होते आणि डोप परीक्षणमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याच्यावर बंदी लादली गेली. तथापि, रियोत सुनावणीदरम्यान वाडाने जर भारताच्या फौजदारी न्यायालयाने एखादा निर्णय दिला व कथित छेडछाडीला दुजोरा मिळाल्यास तदर्थ समितीच्या निर्णयाची स्वीत्झर्लंडचे उच्च न्यायालय समीक्षा करील, असे सुनावणीदरम्यान हटले होते. क्रीडा लवाददेखील स्वीत्झर्लंडमध्येच स्थित आहे.