विश्वविजयाचा आनंद साजरा करणार
By Admin | Published: February 20, 2016 02:42 AM2016-02-20T02:42:09+5:302016-02-20T02:42:09+5:30
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकला की यष्टी उखडतो व ती विजयाची स्मृती म्हणून जपतो. भारताच्या यजमानपदाखाली मार्चमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकही भारत जिंकेल
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकला की यष्टी उखडतो व ती विजयाची स्मृती म्हणून जपतो. भारताच्या यजमानपदाखाली मार्चमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकही भारत जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त करीत यावेळीही यष्टी उखडण्याचे भाग्य माझ्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला,‘ एखादी मालिका किंवा स्पर्धा जिंकल्यानंतर मी यष्टी हातात घेतो. यावेळी देखील यष्टी उखडण्याचा मान माझ्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा बाळगतो. माझ्याकडे स्टम्पस्चे भलेमोठे कलेक्शन झाले आहे. भविष्यातही या स्मृती कायम राहतील. मी कधीही कुठल्या स्टम्पवर दिनांक आणि स्थान लिहित नाही. पण १०-२० वर्षानंतर मॅचचे व्हिडिओ पाहणार तेव्हा कुठला स्टम्प कोणत्या सामन्याचा आहे हे समजू शकेल.’
८ मार्चपासून सुरू होत असलेल्या विश्वचषकात आक्रमक खेळण्याचे वचन देत धोनी पुढे म्हणाला,‘ आक्रमकतेशी कुठलाही समझोता होणार नाही. आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकातही हेच धोरण असेल. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला संघ संतुलित आहे. संघात कुणी जखमी झाला तरी त्याला कव्हर करण्यासाठी तितक्यात ताकदीचा खेळाडू सज्ज असेल असा आहे.’
आॅस्ट्रेलियात टी-२० मालिका जिंकण्यासोबत आम्ही विश्वचषक जिंकण्याची कोनशिला ठेवल्याचे सांगून धोनी म्हणाला, ‘लंकेविरुद्ध विजयी वाटचाल सुरू राहिली. सहकाऱ्यांनी स्वत:ला जखमांपासून दूर ठेवल्यास सांघिक भावनेच्या बळावर विश्वचषक आमचाच असेल. अंतिम ११ खेळाडूंची निवड मात्र सामन्याचा दिवस आणि परिस्थितीवर विसंबून असेल असे त्याने स्पष्ट केले.
विश्वचषकात भारताच्या गटात पाक संघ आहे. यावर धोनी म्हणाला, ‘पाक संघात काही नवे चेहरे दिसतील. त्यांची कामगिरी पहायला आवडेल.’ यंदा निवृत्ती नाहीच...
निवृत्तीबाबत अप्रत्यक्षपणे विचारलेल्या प्रश्नावर धोनीने उलट सवाल करीत सांगितले की ‘यंदा तरी असे काही होणार नाही. आशिया कप आणि विश्व चषकापाठोपाठ आम्हाला आयपीएल खेळायचे आहे. नंतर वर्षभर कसोटी सामने आहेतच. यादरम्यान केवळ पाच वन डे सामने आहेत. माझ्या मते जे उत्तर हवे होते ते तुम्हाला मिळाले आहे.७ जुलै हा ‘एमएस’चा जन्मदिवस आहे. धोनी म्हणाला,‘फुटबॉल खेळायचो तेव्हा जर्सी नंबर २२ होता. भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले व केनियाला गेलो तेव्हा जर्सी नंबरच्या शोधात होतो. सात नंबर रिकामा होता. मी हाच क्रमांक निवडला. लोकांनी दुसऱ्या क्रमांकाची निवड करण्याचा सल्ला दिला पण मी सातवर कायम होतो. १९९९-२००० मध्ये मला क्रिकेटमध्ये ६२५ रुपये स्टायपन्ड मिळायचा. एक दिवस सरावास दांडी मारली तर २५ रुपये कपात व्हायची, या शब्दात माहीने सुरुवातीच्या दिवसांना आवर्जून उजाळा दिला.