फुटबॉलक्रांतीचे पर्व सुरू
By admin | Published: September 28, 2016 05:15 AM2016-09-28T05:15:46+5:302016-09-28T05:15:46+5:30
पुढील वर्षी आॅक्टोबरमध्ये होणारी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. देशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगताचे लक्ष याकडे असेल. भारतीय फुटबॉलक्षेत्रासाठी
पणजी : पुढील वर्षी आॅक्टोबरमध्ये होणारी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. देशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगताचे लक्ष याकडे असेल. भारतीय फुटबॉलक्षेत्रासाठी हा सुवर्णक्षण असेल. आता फुटबॉलक्रांतीचे पर्व सुरू झाले आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. यावर फिफा अध्यक्ष जियानी इन्फेन्टिनो यांनीसुद्धा भारतीय फुटबॉल हा ‘स्लिपिंग जायंट’ न राहता ‘पॅशनेट जायंट’ बनला असल्याचे आपल्या विनोदी शैलीतून सांगितले.इन्फेन्टिनो हे प्रथमच भारतीय भूमीवर आले. निमित्त होते आगामी १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या मानचिन्हाच्या (लोगो) अनावरणाचे.
येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा समारंभ झाला. या वेळी फिफाचे अध्यक्ष इन्फेन्टिनो, आशियाई फुटबॉल महासंघाचेअध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहिम, भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय
गोयल, एआयएफएफचे उपाध्यक्ष श्रीनिवास धेंपे, फिफा आणि एएफसीचे पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फेन्टिनो म्हणाले, की भारतात पहिल्यांदाच आलो आहे. येथील संस्कृती आणि इतिहास याचा चाहता आहे. भारतीय फुटबॉल विकासाकडे वाटचाल करीत आहे. विश्वचषक स्पर्धा ही भारतासाठी खूप मोठी
संधी आहे. या स्पर्धेमुळे भारतात फुटबॉल अधिक लोकप्रिय होईल. फुटबॉलचे वातावरण निर्माण
होईल. कधी काळी फुटबॉलबाबत ‘स्लिपिंग जायंट’ असलेल्या भारताची या खेळाप्रती प्रचंड आस्था वाढली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
हा मैलाचा दगड : पटेल
भारतीय फुटबॉललाही २५ वर्षे झाली; पण इतिहासातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा २०१७ मध्ये होत आहे. ही स्पर्धा भारतीय फुटबॉलला ‘बुस्ट’ देणारी आहे. सध्या १६ वर्षांखालील एएफसी चषक सुरू आहे. ही स्पर्धा विश्वचषकाची रंगीत तालीम होती. आता विश्वचषकाच्या आयोजनामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्थान मिळेल. ही अभिमानाची बाब आहे.
असा आहे लोगो!
मोठ्या थाटात विश्वचषकाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यात उपखंडातील हिंदी महासागराला ठळकपणे दाखवण्यात आले.देशातील समृद्ध संस्कृती, इतिहास, ओळख, अशोकचिन्हाची आठवण करून देणारे पतंग आणि चक्र यांचा मिलाफही यात दिसून येतो.