अव्वल ५० मध्ये आल्यास उत्सव
By admin | Published: May 25, 2017 01:11 AM2017-05-25T01:11:25+5:302017-05-25T01:11:25+5:30
भारतीय फुटबॉल संघाने फिफा मानांकनाची शंभरी गाठली असली तरी त्याचा उत्सव साजरा करण्याइतपत ही कामगिरी नाही.
सचिन कोरडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवा : भारतीय फुटबॉल संघाने फिफा मानांकनाची शंभरी गाठली असली तरी त्याचा उत्सव साजरा करण्याइतपत ही कामगिरी नाही. आपण टॉप-५० मध्ये स्थान मिळवल्यास मोठा उत्सव साजरा करू. भारतीय फुटबॉलमध्ये
तितकी क्षमता आहे. आपण त्याच दिशेने वाटचालही करीत आहोत. गेल्या २१ वर्षांनंतर आपण मानांकनाची शंभरी गाठली ही बाब समाधानाची आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.
गोव्यातील प्रतिष्ठित धेंपो स्पोटर््स क्लबच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त ते गोव्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, फुटबॉल या खेळात आमूलाग्र बदल झाले आहेत. जागतिक स्तरावर स्थान निर्माण करण्यासाठी सर्व साधनसुविधा आवश्यक आहेत. भारतीय
फुटबॉल आता नव्याने भरारी घेत
आहे. मला विश्वास आहे, की आपण टॉप-५० मध्ये स्थान मिळवू. तोच दिवस खरा उत्सवाचा असेल. विश्वचषकाच्या आयोजनाच्या तयारीबाबत विचारले असता
पटेल म्हणाले, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. फिफाच्या मार्गदर्शन प्रणालीनुसार सर्व बाबी पुरविल्या जात आहेत. देशात पहिल्यांदाच मोठ्या पातळीवरची स्पर्धा होत आहे.
ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. सर्व राज्य सरकारांचे यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. या स्पर्धेमुळे भारतातील ‘फुटबॉल फिव्हर’ परत येईल. विश्वचषकाचे गोवा हे एक मुख्य केंद्र असून त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल. गोवा आयोजनात कमी पडणार नाही, याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुरब्बी राजकारणी असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमाच्या भाषणाच्या सुरुवातीलाच पर्रिकरांना टोला मारला. ते म्हणाले, गोवा प्रशासन चालवण्यापेक्षाही अखिल भारतीय फुटबॉल संघटना चालवणे आव्हानात्मक झाले आहे. या खेळात प्रचंड बदल झालेत. खेळातील गुंतवणूक वाढली आहे. साधनसुविधाही गरजेच्या आहेत. या सर्वांची सांगड घालणे सोपे नाही. यावर गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकरांनीही सहमती दर्शवली खरी; मात्र त्यांनीसुद्धा शरद पवार क्रिकेटला आणि पटेल फुटबॉलला प्रगतीपथावर नेत असल्याचा चिमटा काढला.