Edible Oil : खाद्यतेलाच्याबाबतीत सरकार कठोर, कस्टम ड्युटी रद्द केल्यानंतर घेतली अशी अॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:24 PM2022-05-27T18:24:26+5:302022-05-27T18:26:44+5:30
मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा केला जात असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत.
सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून खाद्यतेल आणि तेलबियांसंदर्भात कडक कारवाई सुरू आहे. केंद्रीय पथकाने शुक्रवारी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये खाद्यतेलाशी संबंधित साठेबाजीला लगाम घालण्यासाठी छापे टाकले. मात्र, या छाप्यातून काय निष्पन्न झाले, हे अद्याप समोर आलेले नाही.
मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा केला जात असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. याचा थेट परिणाम महागाईवर होत आहे. तत्पूर्वी, महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच सोयाबीन तेल आणि सूर्यफूलाच्या तेलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
कस्टम ड्युटी रद्द करण्याची घोषणा -
सरकारने वर्षाला 20 लाख टन सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलाच्या इंपोर्टवरील कस्टम ड्यूटी आणि एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर सेस मार्च, 2024 पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतरही स्वयंपाकाचे तेल स्वस्त होईल, अशी अपेक्षा आहे.