सिद्धेश लाडचे मोक्याच्यावेळी शतक
By admin | Published: December 24, 2016 01:09 AM2016-12-24T01:09:45+5:302016-12-24T01:09:45+5:30
मोक्याच्यावेळी फॉर्ममध्ये आलेल्या सिद्धेश लाडचे (१०१*) नाबाद शतक आणि कर्णधार आदित्य तरेचे (७३) अर्धशतक या जोरावर
रायपूर : मोक्याच्यावेळी फॉर्ममध्ये आलेल्या सिद्धेश लाडचे (१०१*) नाबाद शतक आणि कर्णधार आदित्य तरेचे (७३) अर्धशतक या जोरावर बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हैदराबादविरुद्ध पहिल्या दिवशी ५ बाद २५० धावा अशी मजल मारली. अष्टपैलू अभिषेक नायरने (४६*) देखील दिवसभर नाबाद राहताना मुंबईचा डाव सावरण्यात मोलाचे योगदाने दिले.
शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईकरांनी फलंदाजी स्वीकारली; परंतु आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात परतल्याने मुंबईची ४ बाद ३४ अशी केविलवाणी अवस्था झाली. केविल अल्मेडा (९), प्रफुल्ल वाघेला (१३), श्रेयश अय्यर (०) आणि सूर्यकुमार यादव (५) असे महत्त्वाचे फलंदाज झटपट परतल्याने मुंबईचा डाव घसरला.
यानंतर मात्र, तरे - लाड यांनी पाचव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव सावरला; परंतु मोहम्मद सिराजने तरेचा बहुमुल्य बळी मिळवून ही जोडी फोडली. तरेने १४८ चेंडूत १४ चौकारांसह ७३ धावांची दमदार खेळी केली. यावेळी हैदराबाद पुन्हा एकदा पकड मिळविणार अशी चिन्हे होती. मात्र, लाडने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना नायरने दिवसअखेर नाबाद राहत शतकी तडाखा दिला.
या दोघांनी यानंतर दिवसभर हैदराबादला बळी घेण्यापासून रोखताना सहाव्या विकेटसाठी नाबाद १११ धावांची शानदार भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा लाड १९६ चेंडूत १५ चौकार व एका षटकारासह नाबाद १०१ धावांवर खेळत होता. तर, नायरने ७९ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ४६ धावांची खेळी केली. दुसरीकडे, चामा मिलिंद याने ६४ धावांत ३ बळी घेताना मुंबईकरांना धक्के दिले. तर, मोहम्मद सिराजने ५८ धावांत २ बळी घेत चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)
धावफलक-मुंबई (पहिला डाव) : केविन अल्मेडा झे. सुमंथ गो. मिलिंद ९, प्रफुल्ल वाघेला त्रि. गो. मिलिंद १३, श्रेयश अय्यर झे. रेड्डी गो. मिलिंद ०, सूर्यकुमार यादव झे. सुमंथ गो. मोहम्मद सिराज ५, आदित्य तरे झे. बद्रिनाथ गो. मोहम्मद सिराज ७३, सिद्धेश लाड खेळत आहे १०१, अभिषेक नायर खेळत आहे ४६. अवांतर - ३ धावा. एकूण : ९० षटकात ५ बाद २५० धावा. गोलंदाजी : रवि किरण १७-६-४६-०; चामा मिलिंद १८-५-६४-३; मोहम्मद सिराज १८-५-५८-२; मेहदी हसन २०-१०-३५-०; आकाश भंडारी १७-४-४७-०.
कर्नाटकला ८८ धावांत गुंडाळले
विशाखापट्टणम : वेगवान गोलंदाज अश्विन क्रिस्टने कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजीच्या जोरावर तमिळनाडूने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शुक्रवारी पहिल्या दिवशी कर्नाटकचा पहिला डाव ८८ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात तमिळनाडूने दिवसअखेर ४ बाद १११ धावांची मजल मारत पहिल्या डावात २३ धावांची आघाडी घेतली.
तमिळनाडूने नाणेफेक जिंंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अश्विन (६-३१) आणि टी. नटराजन (३-१८) यांच्या अचूक माऱ्यापुढे कर्नाटकचा डाव ३७.१ षटकांत संपुष्टात आला. कर्नाटकतर्फे मनीष पांडेने सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिले.
भारतीय संघातर्फे इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात अनुक्रमे नाबाद ३०३ व १९९ धावांची खेळी करणारे करुण नायर (१४) व सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल (०४) यांना मोठी खेळी करता आली नाही. प्रत्युत्तरादाखल खेळताना तमिळनाडूने दिवसअखेर ४ बाद १११ धावांची मजल मारली. तमिळनाडूची सुरुवातीला ३ बाद ३३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर दिनेश कार्तिक (नाबाद ३१) आणि विजय शंकर (३४) यांनी चौथ्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी करीत डाव सावरला. (वृत्तसंस्था)
हरियाणा ७ बाद २५१
बडोदा : हरियाणा संघाने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीत झारखंडविरुद्ध दिवसअखेर ७ बाद २५१ धावांची मजल मारली. शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी संजय पहल (३८) आणि हर्षल पटेल (२२) खेळपट्टीवर होते. झारखंडतर्फे शाहबाज नदीमने ३० षटकांत ७५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. या व्यतिरिक्त आनंद सिंग व समर कादरी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
नाणेफेक जिंंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या हरियाणातर्फे मधल्या फळीतील रजत पालीवार (४२) व चैतन्य बिश्नोई (४१) यांनी चौथ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. त्याआधी, यष्टिरक्षक फलंदाज नितीन सैनी (२२), शुभम रोहिल्ला (१८) व शिवम चौहाण (२३) यांना मोठी खेळी करता आली नाही. पालीवाल बाद झाल्यानंतर रोहित शर्मा (१८) व अमित मिश्रा (१६) हे फलंदाजही माघारी परतले.
रूप कलारिया, चिराग गांधीने गुजरातला सावरले
जयपूर : चिराग गांधी व रुष कलारिया यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित केलेल्या अभेद्य शतकी भागीदारीमुळे गुजरात संघाला रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या दिवसअखेर ओडिशाविरुद्ध निराशाजनक सुरुवातीनंतर ६ बाद १९७ धावांची मजल मारता आली.
ओडिशाने नाणेफेक जिंंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कर्णधार गोविंद पोद्दारचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करताना दीपक बेहेडा (३-३६) व बसंत मोहंती (२-४८) यांनी गुजरातची ६ बाद ७१ अशी अवस्था केली होती. गांधी (६२) व कलारिया (५९) यांनी त्यानंतर सातव्या विकेटसाठी १२६ धावांची अभेद्य भागीदारी करीत गुजरातचा डाव सावरला. गांधीने १६१ चेंडूंना सामोरे जाताना सहा चौकार लगावले. कलारियाने १३६ चेंडूंच्या खेळीमध्ये सहा चौकार व एक षट्कार ठोकला. या दोघांव्यतिरिक्त भार्गव मेराईने ३१ धावांची खेळी केली. त्याला चांगल्या सुरुवातीचा लाभ घेता आला नाही.
कर्णधार पार्थिव पटेल केवळ १२ धावा काढून माघारी परतला. खराब हवामानामुळे शुक्रवारी केवळ ७९ षटकांच्या खेळ शक्य झाला. (वृत्तसंस्था)