‘चक दे..’तील ‘कबीर’ बनला हरेंद्रसिंह यांच्यासाठी प्रेरणा
By admin | Published: December 23, 2016 01:22 AM2016-12-23T01:22:18+5:302016-12-23T01:22:18+5:30
आपल्या कारकिर्दीत पावला-पावलावर अपमानाचा आणि संघर्षाचा सामना केल्यानंतर एक चॅम्पियन संघ तयार करण्याची प्रेरणा
नवी दिल्ली : आपल्या कारकिर्दीत पावला-पावलावर अपमानाचा आणि संघर्षाचा सामना केल्यानंतर एक चॅम्पियन संघ तयार करण्याची प्रेरणा ‘चक दे इंडिया’मधील शाहरुखच्या भूमिकेमुळे मिळाल्याचा उलगडा ज्युनिअर हॉकी वर्ल्डकप चॅम्पियन भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी आज केला. त्या चित्रपटातील प्रशिक्षक कबीर खानची भूमिका मनात खोलवर रुतून बसल्याचेही हरेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघाने लखनौत नुकत्याच झालेल्या ज्युनिअर हॉकी वर्ल्डकपमध्ये बेल्जियमला धूळ चारत तब्बल १५ वर्षांनी अजिंक्यपद पटकावले. गेल्या दोन वर्षांपासून संघ तयार करीत असलेल्या हरेंद्र यांनी म्हटले, ‘भारतात हॉकी हा भावनेशी जुळलेला विषय आहे आणि आमच्या रक्तात हॉकी आहे. देशवासीयांना आपल्या भूमीवर विजयाची भेट देणे हे भारतीय हॉकी पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक होते. याविषयी आपल्या कारकिर्दीत अनेक बाबींना सामोरे गेल्यानंतर स्वत:ला सिद्ध करण्याचा माझ्यावर दबाव होता व माझ्यासाठी यापेक्षा मोठे व्यासपीठ कोणते असू शकलेच नसते. ही माझ्यासाठी शेवटची संधी होती.’
ते म्हणाले, ‘आम्ही वर्ल्डकप जिंकला नसता तर मी हॉकीशी सर्व नाते तोडून फक्त एअर इंडियात नोकरी करण्याचा निश्चय केला होता.’ बिहारमधील छपरा जिल्ह्यातील हरेंद्र यांनी ‘चक दे इंडिया’तील हॉकी प्रशिक्षक शाहरुख आपल्यासाठी प्रेरणास्थान राहिल्याचे सांगितले.
१00 वेळेस पाहिला
‘चक दे इंडिया’ चित्रपट
हरेंद्रसिंह म्हणाले, ‘मी आणि माझ्या मुलाने १00 पेक्षा जास्त वेळेस ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट पाहिला. जेव्हा हा चित्रपट पाहायचो तेव्हा ही आपलीच कथा असल्याचे मला जाणवले. प्रशिक्षक कबीर खानप्रमाणेच मलादेखील अपमानाचा सामना करावा लागला; परंतु त्याच्याप्रमाणेच मी भावनाप्रधान आणि जिद्दी आहे आणि मी काहीतरी करून दाखविण्याचा निश्चय केला होता. मी आधुनिक हॉकीची कौशल्ये शिकलो. गेल्या दोन वर्षांत मानसिक आणि शारीरिकरूपाने संघाला तयार केले आणि हॉकी इंडियाचेही मला पूर्ण सहकार्य मिळाले. हा संघ स्वत:साठी नाही, तर फक्त देशासाठी खेळतो. यात कोणी पंजाब, झारखंड अथवा ओडिशाचा नव्हे, तर सर्व भारताचे खेळाडू आहेत. या विजयाचा परिणाम २0१८ सीनिअर वर्ल्डकपमध्येदेखील पाहायला मिळेल.’
आपल्या कारकिर्दीतील संघर्षाविषयी ते म्हणाले, ‘मी १९८२ला आशियाई स्पर्धेनंतर प्रथमच हॉकीत आलो तेव्हा माझ्याकडे स्टीकदेखील नव्हती. मी झाडांच्या काड्याची स्टीक करून हॉकी खेळत होतो. मी जेव्हा प्रथमच हॉकी खेळण्यास गेलो तेव्हा माझी हॉकी स्टीक फेकून देण्यात आली आणि आता बिहारी आणि आॅटो रिक्षावालेदेखील हॉकी खेळतील, असा टोमणा त्या वेळेस मारण्यात आला.
रॉटरडम येथे ११ वर्षांपूर्वी हरेंद्रसिंह हे प्रशिक्षक असताना भारतीय संघ स्पेनविरुद्ध ज्युनिअर वर्ल्डकपच्या कांस्यपदक लढतीत पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला होता आणि हा पराभव हरेंद्रसिंह यांच्या चांगला जिव्हारी लागला होता. हरेंद्रसिंह यांना आगामी योजनेविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘मी कधी समाधानी होऊन बसत नाही; परंतु आता तर सुरुवात आहे आणि अनेक ध्येयनिश्चित करायचे आहे. मला माझ्या संघावर विश्वास आहे आणि हा संघ आॅलिम्पिक सुवर्णदेखील जिंकू शकतो.’