Commonwealth Games 2018 : आव्हान सोनेरी यशानंतरचं!
By balkrishna.parab | Published: April 17, 2018 05:48 PM2018-04-17T17:48:18+5:302018-04-17T18:04:08+5:30
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. पण या सोनेरी यशानंतर भारतासमोर खरे आव्हान पुढेच आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि दोन वर्षांनी होणारी ऑलिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भारतासमोर आहे.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेली राष्ट्रकुल स्पर्धा भारतासाठी सोनेरी यश देणारी ठरली. विविध खेळात भारतीय स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करत देशाला 26 सुवर्णपदके जिंकून दिली. त्याबरोबरच प्रत्येकी 20 रौप्य आणि कांस्यपदकेही भारतीयांनी जिंकली. पदकतालिकेत भारतीय चमूने तिसरे स्थान पटकावले. नेमबाजी, कुस्ती, भारोत्तोलन, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स,स्क्वाश अशा विविध क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. पण या सोनेरी यशानंतर भारतासमोर खरे आव्हान पुढेच आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि दोन वर्षांनी होणारी ऑलिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भारतासमोर आहे.
एकेकाळच्या ब्रिटिश राष्ट्रकुलातील वसाहती असलेल्या वसाहतींमधील देश राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येत असतात. मात्र 70 हून अधिक देशांचा सहभाग असला तरी या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पातळीवर फार महत्त्व दिले जात नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिकेसारखे देश या स्पर्धेत आपले अव्वल खेळाडू पाठवत नाहीत. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंकडे अधिकाधिक पदके जिंकण्याची संधी असते. भारतीय खेळाडूही या संधीचा लाभ घेऊन अधिकाधिक पदके जिंकून या संधीचे सोने करतात. गोल्ड कोस्टमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. पण भारतीय क्रीडापटूंना आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही असंच यश मिळणार का या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने नाही, असंच आहे. त्याची अनेक कारणं आहेत, त्यातील पहिलं म्हणजे भारतीय खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत पदके मिळत असली तरी या स्पर्धेतील स्पर्धात्मकता ही आशियाई आणि ऑलिम्पिकच्या तोडीची नसते. त्यामुळे राष्ट्रकुलमध्ये चमकणारे भारतीय खेळाडू या स्पर्धांमध्ये मागे पडतात. अशा परिस्थितीत आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भगरतीय खेळाडूंना आपला दर्जा उंचवावा लागेल.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीचा विचार केल्यास काही खेळातील भारतीय खेळाडूंची कामगिरी ही नक्कीच अपेक्षा उंचावणारी आहे. बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती, नेमबाजी या क्रीडाप्रकारात आता भारतीय हमखास पदकांची अपेक्षा ठेवू शकतात. बॅडमिंटनमध्ये सिंधू, श्रीकांत, सायना यांच्याकडून आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. नेमबाजी हा सुद्धा भारताला हमखास यश मिळवून देणारा खेळ बनलाय. कुस्ती आणि भरोत्तोलनाकडूनही अपेक्षा वाढल्यात.
वैयक्तिक कामगिरीचा विचार केल्यास भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून दिलंय. या स्पर्धाप्रकारात इतर स्पर्धक त्याच्यापेक्षा चांगले मीटरभर मागे होते. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धा आणि पुढच्या ऑलिम्पिकमध्ये देशाला त्याच्याकडून पदकाची अपेक्षा असेल. मात्र त्यासाठी त्याला कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल. वर म्हटल्याप्रमाणे नेमबाजी हा भारताला हमखास पदक मिळवून देणारा खेळ ठरला आहे. नेमबाजीमध्ये अनुभवी नेमबाजांबरोबरच मनू भाकर आणि अनिश भानवाला या उगवत्या नेमबाजांनी आपल्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत राहिल्यास पुढचे दशकभर हे दोन्ही नेमबाद विविध स्पर्धांमध्ये तिरंगा फडकवतील.
टेबल टेनिस आणि भारोत्तोलनामध्ये भरभरून पदके मिळाली आहे. पण त्यांचा आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये आव्हानाचा सामना करताना कस लागणार आहे. कुस्तीमध्ये सुशीलकुमार, विनेश फोगाट आणि बॉक्सिंगमध्ये मेरी कोम यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत. आशियाई स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी ही समाधानाची बाब आहे. मात्र दोन वर्षांनी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत त्यांची तंदुरुस्ती कितपत टिकेल हा प्रश्नच आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी आपल्याला युवा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करावे लागेल. स्वाशमध्ये दीपिका पल्लीकल आणि जोशना चिनप्पा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. त्यांच्याकडूनही आशियाई क्रीडास्पर्धेत सोनेरी कामगिरीची अपेक्षा असेल. राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष आणि महिला हॉकीमध्ये निराशा झाली. तर बॅडमिंटनमध्ये किदम्बी श्रीकांतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र नुकताच बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा श्रीकांत आशियाई स्पर्धेत आपली कामगिरी उंचावेल. तसेच ऑलिम्पिकमध्येही देशासाठी पदक जिंकेल, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.
एकूणच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली असली तरी आपली खरी कसोटी येत्या आशियाई क्रीडा स्पर्धेत लागणार आहे. तिथे चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि इराण या ऑलिम्पिकमध्ये वर्चस्व राखणाऱ्या देशांविरोधात खेळताना भारतीय क्रीडापटू तावून सुलाखून निघतील. त्याअनुभावातून भारतीय चेहरे टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये अधिक चमकदार कारगिरी करतील अशी अपेक्षा बाळगण्यास सध्यातरी हरकत नाही.