बांगलादेशासमोर कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2016 05:20 AM2016-03-09T05:20:11+5:302016-03-09T05:20:11+5:30

आशिया चषकमधील चमकदार कामगिरीनंतर बांगलादेश पात्रता फेरीद्वारे टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला असून बुधवारी त्यांच्यासमोर नेदरलँडचे कडवे आव्हान असेल.

Challenge against Bangladesh | बांगलादेशासमोर कडवे आव्हान

बांगलादेशासमोर कडवे आव्हान

Next

धरमशाला : आशिया चषकमधील चमकदार कामगिरीनंतर बांगलादेश पात्रता फेरीद्वारे टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला असून बुधवारी त्यांच्यासमोर नेदरलँडचे कडवे आव्हान असेल. आशिया चषकाच्या उपविजेतेपदानंतर संघाचा आत्मविश्वास कमी झाला नसून आम्ही नक्की चमकदार कामगिरी करू, असा विश्वास बांगलादेशचा कर्णधार मशरफी मूर्तझा याने व्यक्त केला.
त्याचवेळी बांगलादेशने एकूण ५५ टी-२० सामन्यांतून १८ जिंकताना ३६ सामने गमावले आहेत, तर नेदरलँडने ३९ सामन्यांपैकी २२ सामने जिंकताना १६ सामन्यांत पराभव पत्करला आहे. बांगलादेशने ‘ए’ ग्रुपमध्ये यश मिळवल्यास त्यांचा समावेश मुख्य स्पर्धेच्या गट - २ मध्ये होईल ज्यामध्ये भारत, आॅस्टे्रलिया, पाकिस्तान व न्यूझीलंड या बलाढ्य संघांचा समावेश आहे. तमिम इक्बाल, मुशफिकुर रहीम, सौम्या सरकार अशा अनुभवी फलंदाजांवर बांगलादेशची मदार असून गोलंदाजीमध्ये कर्णधार मूर्तझा, अल-अमीन हुसैन यांच्यावर भिस्त आहे. तसेच अनुभवी शाकीब अल हसन आणि महमुदुल्लाह यांचा अष्टपैलू खेळही बांगलादेशसाठी महत्त्वाचा असेल. त्याचवेळी दुसरीकडे नेदरलँडकडून स्टिफन मायबर्ग, वेल्सी बॅरेस्सी, पीटर बॉरेन, टॉम व बेन कुपर यांची फटकेबाजी निर्णायक ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ
यातून निवडणारबांगलादेश : मशरफी मूर्तझा (कर्णधार), शाकीब अल हसन (उपकर्णधार), अबु हैदर, अल - अमीन हुसैन, अराफत सनी, महमुदुल्लाह, मोहम्मद मिथुन, मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक), मुस्तफिजुर रहमान, नासिर हुसैन, नुरुल हसन, शब्बीर रहमान, सौम्या सरकार, तमिम इक्बाल, तस्कीन अहमद, इम्रूल कायेस, कमरुल इस्लाम रब्बी, मुक्तार अली आणि शुवाग्ता होम.
नेदरलँड : पीटर बॉरेन (कर्णधार), अशान मलिक, वेस्ली बरेसी (यष्टिरक्षक), मुदस्सर बुखारी, बेन कुपर, टॉम कुपर, विवियन किंगमा, स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओ’दौड, मायकल रिप्पोन, पीटर सिल्लार, लोगान वॅन बीक, टीम वॅन डेर गुटेन, रॉल्फ वॅन डेर मर्व, पॉल वॅन मिकेरेन आणि सिकंदर झुल्फिकार.
> नवख्या ओमानविरुद्ध आयर्लंडची लढत
धरमशाला : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणारा ओमान संघ बुधवारी आपला संघ तुलनेत बलाढ्य व अनुभवी असलेल्या आयर्लंड विरुद्ध होणार आहे. याआधीही आयसीसीच्या अनेक स्पर्धांत इंग्लंड, पाकिस्तान यांसारख्या कसलेल्या संघांना पराभवाचा धक्का दिलेल्या आयर्लंडचा विजय ओमानविरुद्ध गृहीत धरला जात आहे. मात्र, टी-२० मध्ये कोणताही संघ कधीही पलटवार करण्याची क्षमता राखून असल्याने पहिल्यांदाच स्पर्धेत खेळणाऱ्या ओमानकडे सर्वांचे लक्ष असेल.
ओमानच्या तुलनेत आयर्लंड संघ किती तरी पटीने बलाढ्य दिसत असून, त्यांच्याकडे क्रिकेट विश्वातील तगड्या संघांविरुद्ध खेळण्याचा दांडगा
अनुभव आहे. गतस्पर्धेत पहिल्याच फेरीतून बाद झालेल्या आयर्लंडसाठी ओ’ ब्रायन बंधूंची कामगिरी निर्णायक ठरते.
स्पर्धेच्या इतिहासात आयर्लंडने चमकदार कामगिरी करताना बांगलादेश (२००९), इंग्लंड (२०१०), वेस्ट इंडीज (२०१२) आणि झिम्बाब्वे (२०१४) या संघांना आश्चर्यकारकरीत्या नमवण्याचा पराक्रम केला आहे. दुसरीकडे ओमान संघानेही गतस्पर्धेच्या पात्रता फेरीत सर्वांचे लक्ष वेधले होते.

Web Title: Challenge against Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.