जेतेपदासाठी चेल्सी, सिटी, युनायटेड यांच्यात चुरस
By admin | Published: December 20, 2014 02:22 AM2014-12-20T02:22:43+5:302014-12-20T02:22:43+5:30
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये रविवारी (दि. २१ डिसेंबर) परंपरागत प्रतिस्पर्धी लिव्हरपूल आणि आर्सनल यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होणार आहे.
केदार लेले, लंडन
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये रविवारी (दि. २१ डिसेंबर) परंपरागत प्रतिस्पर्धी लिव्हरपूल आणि आर्सनल यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. सोमवारी अव्वलस्थानी असणारा चेल्सीचा संघ स्टोक सिटी विरुद्ध दोन हात करणार आहे. तसेच उद्या, शनिवारी गतविजेता आणि गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मँचेस्टर सिटीची लढत क्रिस्टल पॅलेस विरुद्ध होणार आहे. तसेच सलग सहा सामने जिंकणाऱ्या मँचेस्टर युनायटेडचा सामना अॅस्टन व्हिला विरुद्ध होणार आहे.
ईपीलमध्ये तिरंगी चुरस
अव्वलस्थानी असलेला चेल्सी (१६ सामन्यांत ३९ गुण), अनुक्रमे तीन आणि आठ गुणांच्या पिछाडीवर असलेला मँचेस्टर सिटी (१६ सामन्यांत ३६ गुण) आणि मँचेस्टर युनायटेड (१६ सामन्यांत ३१ गुण) या संघांमध्ये जेतेपदासाठी तिरंगी चुरस दिसून होत आहे.
मँचेस्टर सिटी विरुद्ध क्रिस्टल पॅलेस सर्जियो अॅग्वेरो, कप्तान वॅन्सॉ कंपनी, झेको आणि योवेटिक यांच्या दुखापती मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेलीग्रिनी यांच्या डोकेदुखी बनल्या आहेत. महत्त्वाच्या काळात होणाऱ्या सात लढतीत दुखापतग्रस्त मँचेस्टर सिटीची भिस्त पूर्णत: फार्मात असलेले फ्रँक लँपार्ड आणि याया टोरे यांच्यावर टिकून आहे. मँचेस्टर सिटीला सलग सहाव्या विजयाची प्रतीक्षा आहे, तर आपले आव्हान टिकवण्यासाठी क्रिस्टल पॅलेसला सामना किमान बरोबरीत सोडवण्याची गरज आहे.