पराभवाची शृंखला खंडित करण्याचे दिल्लीपुढे आव्हान
By admin | Published: April 11, 2015 11:39 PM2015-04-11T23:39:38+5:302015-04-11T23:39:38+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ फिरोजशहा कोटला या घरच्या मैदानावर आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी खेळेल.
नवी दिल्ली : गेल्या दोन सत्रांत सतत पराभवास सामोरे जात असलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ फिरोजशहा कोटला या घरच्या मैदानावर आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी खेळेल.
चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध दिल्लीला अवघ्या एका धावेने पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. या स्पर्धेत दिल्लीचा हा सलग दहावा, तर २०१३ पासूनचा ३१ सामन्यांतील २६वा पराभव होता. अखेरचा विजय त्यांनी मागच्या वर्षी शारजात नोंदवला होता. कोटलावरदेखील गेल्या दोन सत्रांत संघाला यश मिळालेले नाही. या मैदानावर त्यांनी अखेरचा विजय २१ एप्रिल २०१३ रोजी मुंबई इंडियन्सवर मिळविला होता. त्यानंतर सलग सात सामने याच मैदानावर गमावले. मागच्या सत्रातील सर्व पाचही सामन्यांत दिल्ली येथे पराभूत झाला. यंदा या संघाने संघात आमूलाग्र बदल केला आहे; पण चेन्नईकडून एका धावेने पराभव पत्करावा लागल्याने भाग्याची त्यांना साथ नाही, असेच संकेत मिळतात. या संघाकडून केवळ एल्बी मोर्केल हाच धावा काढू शकला. पिंच हिटर म्हणून त्याला बढती देण्यात आली होती. त्याने नाबाद ७३ धावा ठोकल्या; पण अखेरच्या चेंडूवर षटकार खेचण्याचे आव्हान त्याला पेलवले नव्हते.
उद्याच्या सामन्यात पुन्हा दिल्लीचा फलंदाजी क्रम बदलू शकतो. मयंक अग्रवाल, सी. एम. गौतम आणि श्रेयांस अय्यर हे फ्लॉप ठरल्याने कर्णधार जेपी डुमिनी आणि युवराजसिंग यांनाच वरच्या स्थानावर पाठविणे कोच गॅरी कर्स्टन यांच्या हितावह ठरेल. लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज मागच्या सामन्यात खेळला नव्हता. तो उद्या पुनरागमन करेल.
दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात मोलाची भूमिका बजावली होती. कोटलाच्या खेळपट्टीवर चेंडू मंद आणि खाली राहत असल्याने इम्रान ताहीर व अमित मिश्रा यांना लाभ होऊ शकतो. झाहीर खान किंवा मोहंमद शमी यांनादेखील संधी मिळू शकते.
राजस्थान रॉयल्सने गत उपविजेत्या किंग्स पंजाबला नमविल्याने संघात उत्साह आहे. मागच्या वर्षी कोटलावर त्यांनी दिल्लीचा पराभव केला आहे; पण त्यांनाही चिंता आहे ती आघाडीच्या फलंदाजांचीच! पुण्यात फॉल्कनर-हुडा यांनी तळाच्या स्थानाला धावा केल्या नसत्या, तर संकट ओढवले असते. अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच बाद झाला. संजू सॅमसन, करुण नायर, स्टुअर्ट बिन्नी हे प्रभावी ठरले नाहीत. शेन वॉटसन जखमी असल्याने कर्णधार स्टीव्हन स्मिथ याच्यावरच पुन्हा धावा काढण्याची अधिक जबाबदारी असेल.
गोलंदाजीत टीम साऊदी, ख्रिस मॉरिस आणि जेम्स फॉल्कनर यांचा तुफानी मारा तर प्रवीण तांबेची फिरकी निर्णायक ठरू शकेल. रॉयल्सने गोलंदाजीच्या बळावरच पंजाबला नमविले. तोच शिक्का पुन्हा चालल्यास दिल्लीच्या समस्या वाढू शकतील. (वृत्तसंस्था)
जेपी डुमिनी (कर्णधार), युवराजसिंग, मनोज तिवारी, क्विंटन डिकॉक, इम्रान ताहीर, नाथन कोल्टर नाइल, अँजेलो मॅथ्यूज, गुरिंदर संधू, ट्रेव्हिस हेड, एल्बी मोर्केल, मार्कस स्टोयनिस, केदार जाधव, मयंक अग्रवाल, मोहंमद शमी, अमित मिश्रा, जयदेव उनादकत, झहीर खान, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, जयंत यादव, श्रेयंस अय्यर, सी. एम. गौतम, श्रीकर भरत, केके जियास, डोमिनिक मुथ्थूस्वामी.
शेन वाटसन : (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, ख्रिस मॉरिस, ज्युुआॅन थेरोन, बरिंदरसिंग सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी,
प्रदीप साहू.