गोव्यापुढे केरळ संघाचे आव्हान
By Admin | Published: March 23, 2017 12:22 AM2017-03-23T00:22:33+5:302017-03-23T00:22:33+5:30
देशातील प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा असलेल्या ७१ व्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य लढती बांबोळी येथील जीएमसी
पणजी : देशातील प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा असलेल्या ७१ व्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य लढती बांबोळी येथील जीएमसी मैदानावर उद्या (दि.२३) खेळविण्यात येतील. गोव्याचा सामना बलाढ्य केरळविरुद्ध तर पश्चिम बंगालचा सामना मिझोरामविरुद्ध होईल. हे सामने अनुक्रमे दुपारी ३ वा. आणि संध्याकाळी ७ वाजता होतील.
सेमीफायनल लढतींचे वेळापत्रक जाहीर करताना बुधवारी गफलत झाली होती. आयोजकांनी हे सामने गुरुवारी आणि शुक्रवारी होतील असे जाहीर केले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला होता. अखेर अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे स्पर्धा संचालक अनिल कामत यांनी स्थानिक आयोजकांशी चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी दूर करीत त्यांनी वेळापत्रकात बदल करीत उपांत्य सामने गुरुवारीच होणार असल्याचे जाहीर केले. दूरदर्शनवर सामन्यांचे थेट प्रक्षेपणही दाखविण्यात येईल.
दरम्यान, गोव्याची धुरा फ्रान्सिस फर्नांडिसकडे आहे. स्पर्धेत मार्कुस मास्कारेन्हासने सुद्धा शानदार प्रदर्शन केले आहे. हे दोन्ही खेळाडू गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. मेघालय संघाविरुद्ध २-१ अशी विजयी सलामी दिल्यानंतर गोव्याने बंगालविरुद्ध बरोबरी साधली होती. त्यानंतर चंदिगडविरुद्धचाही सामना अनिर्णित राखला होता. त्यानंतर माजी विजेत्या सेनादलाविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन करीत गोव्याने सेमीफायनलची जागा पक्की केली होती. हाच विजय गोव्यासाठी आत्मविश्वास उंचावून देणारा ठरला. प्रशिक्षक कोस्तायांनी खेळाडूंमध्ये मोठा बदल केला. त्यांनी चार सामन्यांत तीन गोलरक्षक बदलले. संघाच्या बचावातही बदल करण्यात आले. लेनी परेरा आणि फ्रान्सिस फर्नांडिस हे दोघेही अनफिट असल्यामुळे ते उद्याच्या सामन्यात खेळतील की नाही, याबद्दल साशंकता आहे. असे झाल्यास त्यांची अनुपस्थिती गोव्यासाठी महागडी ठरूशकते. सेनादलविरुद्ध मिळवलेला विजय संघासाठी आत्मविश्वास उंचावणारा ठरला. उपांत्य सामन्यातही आम्ही मोठ्या उमेदीने मैदानात उतरणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
घरच्या चाहत्यापुढे खेळ करण्यासाठी आम्ही सुद्धा उत्साही आहे, असे प्रशिक्षक कोस्ता यांनी सांगितले.
दुसरीकडे, केरळने उपांत्य फेरीत सरळ प्रवेश केला आहे. त्यांचा आघाडीपटू ज्योबी जस्टीन, अशरुद्दिन आणि कर्णधार उस्मान पी यांची आक्रमकता महत्त्वपूर्ण ठरली आहे. २०१२-१३ नंतर केरळ संघ प्रथम अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्साही आहे.