‘नंबर वन’ कायम राखण्याचे आव्हान
By admin | Published: August 18, 2016 01:40 AM2016-08-18T01:40:46+5:302016-08-18T01:40:46+5:30
श्रीलंकेने मायदेशात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य आॅस्टे्रलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिल्याचा फायदा भारतीय संघाला झाला.
पोर्ट आॅफ स्पेन : श्रीलंकेने मायदेशात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य आॅस्टे्रलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिल्याचा फायदा भारतीय संघाला झाला. याजोरावर भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. मात्र, हेच स्थान आणखी भक्कम करण्यासाठी टीम इंडियाला गुरुवारपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुध्दच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल.
विंडिजविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली आहे. मात्र, आता अखेरच्या सामन्यात बाजी मारुन आयसीसी क्रमवारीतील अग्रस्थान भक्कम करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी कर्णधार विराट कोहली यावेळी आपला तगडा संघ उतरवेल यात शंका नाही.
या मालिकेत भारताने फलंदाजी व गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजीत रहाणेसह रविचंद्रन अश्विन सहाव्या स्थानी यशस्वी झाले. फलंदाजीवर नजर टाकल्यास रहाणे, कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल आणि अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यांच्यावर भारताची मुख्य मदार असेल. त्याचवेळी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर मात्र विशेष दबाव असेल.
अश्विनने दोन शतक झळकावून आपली चमक दाखवली. तर एका द्विशतकाच्या जोरावर कोहली मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनला आहे. तरी, गतसामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक झाली. तसेच शिखर धवनचे अपयश ही संघाची चिंतेची बाब आहे. त्यामुळेच जर भारताला आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखायचे असेल, तर आघाडीच्या फलंदाजांनी धावा काढणे आवश्यक आहे.
भारताच्या गोलंदाजांनी देखील चमकदार कामगिरी केली आहे. विंडिजच्या कोरड्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंनी सातत्याने अचूक मारा करताना प्रतिकूल परिस्थितीतून भारताला सावरले. तर, गतसामन्यात भुवनेश्वर कुमारने मोक्याच्यावेळी अर्धा संघ बाद करत यजमानांचे कंबरडे मोडले. शिवाय इशांत शर्मा, अश्विन, जडेजा आणि मोहम्मद शामी देखील चांगल्या लयीत आहेत. (वृत्तसंस्था)
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, वृध्दिमान साहा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, चेतेश्वर पुजारा आणि स्टुअर्ट बिन्नी.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, देवेंद्र बिशू, जेरमेनी ब्लॅकवूड, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्रावो, रोस्टन चेस, शेन डॉर्विच, शॅनन गॅब्रीएल, लिआॅन जॉन्सन, मार्लेन सॅम्युअल्स, मिग्युएल कमिन्स, अलझारी जोसेफ आणि शाइ होप.