मल्लांची आॅलिम्पिक कोटासाठी धडपड
By Admin | Published: May 6, 2016 05:06 AM2016-05-06T05:06:22+5:302016-05-06T05:06:22+5:30
येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक पात्रता स्पर्धेद्वारे भारताचे मुख्य मल्ल आॅलिम्पिक कोटा मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. आॅलिम्पिक कोटा मिळवण्याची ही अखेरची संधी असल्याने
इस्तंबूल : येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक पात्रता स्पर्धेद्वारे भारताचे मुख्य मल्ल आॅलिम्पिक कोटा मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. आॅलिम्पिक कोटा मिळवण्याची ही अखेरची संधी असल्याने जास्तीत जास्त खेळाडूंचा आपला आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न असल्याने या वेळी मोठी चुरस दिसून येईल.
विशेष म्हणजे १४ सदस्यीय भारताच्या चमूमध्ये गीता आणि बबिता फोगट या अव्वल महिला मल्लांची उणीव प्रकर्षाने जाणवेल. ६ ते ८ मेपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत सर्वच भारतीय मल्लांचा आॅलिम्पिक कोटा मिळवण्याचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे प्रत्येक वजनी गटातून केवल आघाडीच्या दोन मल्लांना आॅलिम्पिक तिकीट मिळणार असल्याने स्पर्धेतील सर्वच मल्लांसमोर कठीण आव्हान असेल.
दखल घेण्याची बाब म्हणजे गत आठवड्यात बेशिस्तपणाच्या कारणावरून भारतीय कुस्ती महासंघाने गीता (५८ किलो), बबिता (५३), सुमित (१२५ फ्री स्टाइल) आणि राहुल आवरे (७५ फ्री स्टाइल) या मल्लांना तात्पुरते निलंबित केले. यामुळे या मल्लांचे आॅलिम्पिक स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यातच आतापर्यंत एकाही भारतीय महिला मल्लाने आॅलिम्पिक कोटा मिळवला नसल्याने सर्वांचे लक्ष या वेळी विनेश फोगाटवर असेल. (वृत्तसंस्था)
महिलांच्या गटात या स्पर्धेत बबिताच्या जागी ललिता आणि गीताच्या जागी साक्षी मलिक खेळणार आहेत. त्याचबरोबर शिल्पी शेरोन (६३), गीतिका जाखड (६९) आणि किरण (७५) यांच्या कामगिरीवरही भारताची मदार असेल. दुसरीकडे पुरुषांच्या गटात मौसम खत्री (९७) भारताचे नेतृत्व करेल. तसेच गोपाल यादव (८६) आणि हितेंदर (१२५) हे भारताकडून आॅलिम्पिक कोटा मिळवण्याचा प्रयत्न करतील.