भारतासमोर नेदरलँडचे आव्हान
By admin | Published: August 11, 2016 12:47 AM2016-08-11T00:47:37+5:302016-08-11T00:47:37+5:30
अर्जेंटिनाविरुद्ध शानदार विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला गुरुवारी (दि. ११) आॅलिम्पिकमध्ये जागतिक मानांकनातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँडशी झुंजावे लागणार
रिओ : अर्जेंटिनाविरुद्ध शानदार विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला गुरुवारी (दि. ११) आॅलिम्पिकमध्ये जागतिक मानांकनातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँडशी झुंजावे लागणार आहे. या लढतीत विजय मिळाल्यास स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा प्रवेश निश्चित होईल. आॅलिम्पिकमधील पहिल्या सामन्यात आयर्लंडवर ३-२
असा विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या लढतीत भारताला विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीकडून १-२ ने मात खावी लागली होती; मात्र यानंतर तिसऱ्या लढतीत टीम इंडियाने जोरदार कमबॅक करताना अर्जेंटिनाला २-१ ने धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघ ब गटातील टॉप चार संघांत कायम आहे.
आता साखळी फेरीत जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे भारताचे लक्ष्य असेल. जेणेकरून टॉप ८ संघांच्या लढतीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन आॅस्ट्रेलियाशी सामना टळू शकेल. दुसरीकडे नेदरलँड संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. आॅलिम्पिकमधील पहिल्या साखळी सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधल्यानंतर या संघाने आयर्लंडचा ५-० ने धुव्वा उडविला होता,
तर त्यानंतरच्या लढतीत कॅनडाला ७-० अशी धूळ चारली होती. यामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या संघाविरुद्ध भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत आम्ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. उर्वरित दोन्हीही सामन्यांत खेळाडू विजय मिळविण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील; मात्र हा मार्ग सोपा नाही. त्यासाठी खेळाडूंना क ठोर मेहनत घ्यावी लागेल. नेदरलँडविरुद्धच्या लढतीसाठी आम्ही रणनीती आखली आहे. या जोरावर नक्कीच भारत विजय मिळवेल, अशी आशा आहे.
- श्रीजेश, कर्णधार, भारत
१९८४पासून विजयाची प्रतीक्षा आॅलिम्पिकमध्ये भारत आणि नेदरलँड आतापर्यंत ११ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात भारताने ६, तर नेदरलँडने ३ सामने जिंकले, तर २सामने बरोबरीत सुटले होते. भारताने यापूर्वी नेदरलँडला १९८४ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ५-२ ने नमविले होते.
महिला हॉकी : आॅस्ट्रेलियाने भारताला ६-१ने धुतले
३६ वर्षानंतर आॅलिम्पिक खेळणाऱ्या भारताच्या महिला हॉकी संघाला आॅस्ट्रेलियाने वेगवान खेळाच्या बळावर
ब गटाच्या साखळी सामन्यात ६-१ ने धुतले. भारताचा हा दुसरा पराभव आहे. त्याआधी पहिला सामना भारताने जपानविरुद्ध २-२ असा बरोबरीत राखला. या पराभवामुळे भारताला तीन सामन्यात एकच गुण मिळाला. यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे.