पुण्याला पुनरागमनाचे आव्हान

By Admin | Published: May 9, 2016 11:00 PM2016-05-09T23:00:09+5:302016-05-09T23:00:09+5:30

पहिल्या सत्रात पुणेकरांनी हैदराबादला नमवले होते, मात्र सध्याचा फॉर्म पाहता हैदराबाद संघ तुलनेत बलाढ्य दिसत असून पराभवाचा वचपा काढण्यास ते उत्सुक असतील

Challenge of return to Pune | पुण्याला पुनरागमनाचे आव्हान

पुण्याला पुनरागमनाचे आव्हान

googlenewsNext

विशाखापट्टणम : यंदाच्या मोसमातून आयपीएल पदार्पण करणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ निराशाजनक कामगिरीच्या गर्तेत सापडला असताना मंगळवारी त्यांच्यासमोर आव्हान असेल ते सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबादचे. याआधी पहिल्या सत्रात पुणेकरांनी हैदराबादला नमवले होते, मात्र सध्याचा फॉर्म पाहता हैदराबाद संघ तुलनेत बलाढ्य दिसत असून पराभवाचा वचपा काढण्यास ते उत्सुक असतील.
गुणतालिकेत पुणेकर सहाव्या स्थानी असून त्यांना १० सामन्यांतून केवळ ३ विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ अशीच स्थिती असेल. त्याचवेळी हैदराबादने मात्र अडखळत्या सुरुवातीनंतर जबरदस्त मुसंडी मारताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. ९ सामन्यांतून ६ विजय मिळवताना हैदराबादने १२ गुणांची कमाई केली आहे. शिवाय गतसामन्यात त्यांनी गतविजेत्या बलाढ्य मुंबईचा सहजपणे धुव्वा उडवला असल्याने हैदराबादचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील पुण्याला स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी आता उरलेल्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल. हैदराबाद, दिल्ली व मुंबईवरील विजय वगळता पुणेकर संपूर्ण स्पर्धेत झगडताना दिसले. शिवाय फाफ डू प्लेसिस, स्टीव्ह स्मिथ, केव्हिन पीटरसन आणि मिशेल मार्श हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडले. याचाही मजबूत फटका पुण्याला बसला. त्याचवेळी उस्मान ख्वाजा व जॉर्ज बेली यांची संघात वर्णी लागली. मात्र त्यांना अजून आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.
गोलंदाजांची बाजूही कमजोर असल्याने पुण्याला प्रतिस्पर्धी संघाला मर्यादित धावसंख्येत रोखण्यात अपयश येत आहे. त्यांचा कोणताही गोलंदाज सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल १५ गोलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. फलंदाजीत केवळ अजिंक्य रहाणेने सातत्यपूर्ण कामगिरी करताना सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांत तिसरे स्थान मिळवले आहे.
दुसरीकडे मजबूत गोलंदाजी हैदराबादची ताकद आहे. अनुभवी व बलाढ्य गोलंदाजांच्या जोरावर हैदराबादपुढे प्रतिस्पर्धी संघ अडखळताना दिसतो. आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजूर रहमान आणि बरिंदर सरन यांच्याविरुद्ध फलंदाज चाचपडताना दिसतात. त्याचवेळी फलंदाजीमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन या धडाकेबाज सलामीवीरांसह
युवराज सिंग, केन विल्यम्सन आणि अष्टपैलू मोझेस हेन्रिक्स यांच्यावर संघाची मदार असेल.(वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
रायझिंग पुणे सुपरजायंट्स :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बाबा अपराजित, रविचंद्रन आश्विन, मुरुगन आश्विन, अंकुश बन्स, रजत भाटिया, स्कॉट बोलँड, दीपक चहार, अशोक दिंडा, पीटर हॅण्डकॉम्ब, जसकरण सिंग, अ‍ॅल्बी मॉर्केल, इश्वर पांडे, इरफान पठाण, थिसारा परेरा, इशांत शर्मा, आरपी सिंग, सौरभ तिवारी, अ‍ॅडम झम्पा, उस्मान ख्वाजा आणि जॉर्ज बेली.
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आशिष रेड्डी, रिकी भुई, बिपुल शर्मा, टे्रंट बोल्ट, बेन कटिंग, शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुडा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरन, टी. सुमन, आदित्य तरे, केन विल्यम्सन आणि युवराज सिंग.

Web Title: Challenge of return to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.