धोनीला रोखण्याचे आव्हान : रैना
By admin | Published: February 3, 2016 03:15 AM2016-02-03T03:15:38+5:302016-02-03T03:15:38+5:30
आयपीएलच्या नव्या सत्रात महेंद्रसिंह धोनीविरुद्ध खेळणे आणि त्याचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ रोखणे सर्वांत मोठे आव्हान राहणार आहे, असे मत आयपीएलचा नवा संघ गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने व्यक्त केले.
नवी दिल्ली : आयपीएलच्या नव्या सत्रात महेंद्रसिंह धोनीविरुद्ध खेळणे आणि त्याचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ रोखणे सर्वांत मोठे आव्हान राहणार आहे, असे मत आयपीएलचा नवा संघ गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने व्यक्त केले.
रैना व धोनी यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत केवळ चार सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यातील अखेरची लढत २००६ मध्ये खेळली गेली होती. रैना भारतीय संघाव्यतिरिक्त आयपीएलच्या अखेरच्या आठ सत्रांमध्ये चेन्नई सुपरकिंग्समध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेला आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत आपल्या फ्रॅन्चायझीतर्फे सर्व सामने खेळणाऱ्या रैनाने त्याच्या संघाचे नाव, लोगो, कर्णधार आणि प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘वेगवेगळ्या संघांकडून कसे खेळणार, याबाबत मी आणि धोनीने आॅस्ट्रेलियात चर्चा केली. ही रोमांचक बाब ठरेल. धोनीला बाद केल्यानंतर जडेजा आनंद साजरा करणार, याची कल्पनाही रोमांचक वाटते. मी धोनीने काही अंतिम सामने सोबत खेळलेले आहेत. धोनीला हेलिकॉप्टर शॉट खेळण्यापासून रोखणे आव्हान ठरणार आहे.’
आयपीएलमध्ये सर्वाधिक ३६९९ धावा फटकावणारा रैना म्हणाला, ‘मी आठ वर्षे चेन्नई सुपरकिंग्स संघातर्फे एका महान कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळलेलो असून आता खेळाडू म्हणून परिपक्वता आलेली आहे. आता माझ्यापुढे नवे आव्हान आहे. माझा संघ समतोल आहे.’ राजकोट फ्रॅन्चायझीने आतापर्यंत रैनाव्यतिरिक्त न्यूझीलंडचा ब्रॅन्डन मॅक्युलम, विंडीजचा ड्वेन ब्राव्हो, आॅस्ट्रेलियाचा जेम्स फॉकनर आणि स्थानिक खेळाडू व भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना करारबद्ध केले आहे. (वृत्तसंस्था)
आता होणाऱ्या लिलावाबाबत उत्सुकता आहे. आमचे संघव्यस्थापन, प्रशिक्षक त्यात सहभागी होणार असून, आम्ही संयुक्तपणे संघाबाबत विचार करू. भारतात आणि विदेशात प्रतिभावान खेळाडूंची उणीव नाही. आम्ही चांगला संघ तयार करण्यात यशस्वी ठरू, असा मला विश्वास आहे. आता २००८ च्या तुलनेत स्थिती वेगळी असून अनेक युवा खेळाडू छाप सोडण्यास उत्सुक आहेत. आमच्या संघात काही चांगले खेळाडू आहेत. मॅक्युलम व फॉकनर यांच्या समावेशामुळे संघ मजबूत झाला आहे. आगामी चार महिने शिस्तबद्ध जीवन जगावे लागणार आहे. टी-२० साठी जीवनात शिस्त असणे आवश्यक असते. खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असते. मेहनत घेतली तरच यश मिळवता येते.- सुरेश रैना