केकेआरपुढे ‘सुपर शो’ रोखण्याचे आव्हान
By admin | Published: May 3, 2017 12:43 AM2017-05-03T00:43:27+5:302017-05-03T00:43:27+5:30
सलग तीन सामने जिंकल्यानंतर एक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे सावध झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारी मनोधैर्य
कोलकाता : सलग तीन सामने जिंकल्यानंतर एक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे सावध झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारी मनोधैर्य उंचावलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंटच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत विजय मिळवत आयपीएलच्या दहाव्या पर्वात प्ले आॅफमधील स्थान निश्चित करण्यात केकेआर संघ उत्सुक आहे.
केकेआरची आतापर्यंतची स्पर्धेतील वाटचाल शानदार आहे. त्यांनी १० पैकी ७ सामन्यांत विजय मिळवत १४ गुणांची कमाई केली आहे. बुधवारच्या लढतीत त्यांनी विजय मिळवला तर त्यांचा प्ले आॅफमधील प्रवेश निश्चित होईल. गेल्या १० दिवसांमध्ये तीन सामने जिंकणाऱ्या केकेआरचा विजयरथ सनरायजर्स हैदराबाद संघाने रोखला होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ या पराभवातून बोध घेत चुका सुधारण्यास प्रयत्नशील आहे. सुपरजायंट संघाबाबत विचार करता रॉयल चॅलेंजर्स व गुजरात लायन्सचा पराभव केल्यानंतर हा संघ विजयाची हॅट््ट्रिक नोंदवण्यास उत्सुक आहे. १० सामन्यांत १२ गुणांची कमाई करणारा पुणे संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. ‘जर-तर’चा फेरा टाळण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, याची स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाला चांगली कल्पना आहे.(वृत्तसंस्था)
स्टोक्सला गवसला सूर
बेन स्टोक्सला सूर गवसल्यामुळे पुणे संघात नवा उत्साह संचारला असून केकेआरला झूंज देण्यास तयार आहे. लायन्सविरुद्ध पुणे येथे सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत इंग्लंडच्या या अष्टपैलूने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला.