आरसीबीपुढे बलाढ्य मुंबई इंडियन्सचे आव्हान
By admin | Published: May 1, 2017 01:35 AM2017-05-01T01:35:11+5:302017-05-01T01:35:11+5:30
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला असून आयपीएलमध्ये त्यांना सोमवारी बलाढ्य मुंबई इंडियन्सच्या
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला असून आयपीएलमध्ये त्यांना सोमवारी बलाढ्य मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी आरसीबीचे फलंदाज छाप सोडण्यास प्रयत्नशील आहेत.
मुंबई इंडियन्स १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे, तर बंगळुरु संघाला १० सामन्यांमध्ये केवळ दोनदा विजयाची चव चाखता आली आहे. हा संघ तळातून दुसऱ्या स्थानी आहे. मुंबई संघाने आतापर्यंत ९ पैकी सात सामन्यांत विजय मिळवला आहे. या संघाची प्ले आॅफच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. उभय संघांदरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत यजमान संघाचे पारडे वरचढ भासत आहे. कारण येथे मुंबई इंडियन्सने केवळ एकच सामना गमावला आहे.
सलामीवीर पार्थिव पटेलचा फॉर्म मुंबई इंडियन्स संघासाठी जमेची बाजू आहे. त्याने गुजरात लायन्सविरुद्धच्या लढतीत ७० धावांची खेळी केली होती. पार्थिव बटलरच्या साथीने संघाला चांगली सुरुवात करून देण्यास उत्सुक आहे. मुंबईने शनिवारी रात्री गुजरातविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय साकारला. उभय संघ निर्धारित २० षटकांनंतर १५३ धावसंख्येसह बरोबरीत होते. सोमवारच्या लढतीत मुंबई संघ सुरुवातीपासून वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)