इंग्लंडपुढे धडाकेबाज आफ्रिकेचे आव्हान
By admin | Published: March 18, 2016 03:42 AM2016-03-18T03:42:14+5:302016-03-18T03:42:14+5:30
सराव सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीनंतर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा संघ शुक्रवारी इंग्लंड विरुद्ध टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्याच्या निर्धाराने उतरेल.
मुंबई : सराव सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीनंतर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा संघ शुक्रवारी इंग्लंड विरुद्ध टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्याच्या निर्धाराने उतरेल. सलामीला ख्रिस गेलच्या वादळी खेळीपुढे वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवास सामोरे गेलेल्या इंग्लंडसाठी आफ्रिकेचे तगडे आव्हान नक्कीच सोपे नसेल. त्यामुळेच दडपणाखाली खेळणाऱ्या इंग्लंडचा या सामन्यात कसा खेळ होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय गृहीत धरला जात आहे. याआधी या मैदानावर झालेल्या आपल्या दोन्ही सामन्यांत आफ्रिकन्स्ने धावांचा पाऊस पाडला असल्याने त्यांच्या फलंदाजांसाठी येथील खेळपट्टी चांगलीच ओळखीची झाली आहे. त्यामुळेच क्विंटन डिकॉक, फाफ डू प्लेसिस, हाशिम आमला, जेपी ड्युमिनी आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स अशा बलाढ्य फलदांजांपुढे इंग्लंडच्या गोलंदाजांची मोठी परीक्षा असेल.
पहिला सामना गमावल्याने दडपणाखाली आलेल्या इंग्लंडच्या मानसिकतेचा फायदा घेण्यास दक्षिण आफ्रिका प्रयत्नशील असेल. मातब्बर फलंदाजांच्या जोरावर धावांचा हिमालय उभारण्याची आणि कोणत्याही धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची क्षमता या संघात आहे. त्याचवेळी अनुभवी डेल स्टेनसह कागिसो रबाडा, काएल एबोट आणि रिली रोसो यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे. त्याचवेळी इम्रान ताहीर आपल्या भेदक फिरकीच्या जोरावर इंग्लंडला जेरीस आणू शकतो.
दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यक असलेला इंग्लंड या सामन्यात प्रचंड दबावाखाली उतरेल. वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजांची झालेली पिटाई इंग्लंडसाठी चिंतेचा विषय असेल. कारण एकट्या गेलने इंग्लिश गोलंदाजी फोडलेली असताना डिकॉक, प्लेसिस आणि डिव्हिलियर्स या स्फोटक त्रयीला रोखण्याचे मुख्य आव्हान त्यांच्याकडे असेल. जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जो रूट, कर्णधार इआॅन मॉर्गन आणि यष्टिरक्षक जोस बटलर यांच्यावर संघाच्या फलंदाजीची मदार असेल. तर स्पर्धेत फिरकी मारा निर्णायक ठरत असल्याने मोईन अली, आदिल रशीद यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. (क्रीडा प्रतिनिधी)
संघ यातून निवडणार
दक्षिण आफ्रिका : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), काइल एबोट, हाशिम अमला, फरहान बेहारडियन, क्वींंटन डिकॉक, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्यूमिनी, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, अॅरोन फांगिसो, कागिसो राबाडा, रिली रोसोऊ, डेल स्टेन आणि डेव्हिड विसे.
इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स विन्स, अॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, मोईन अली, जोस बटलर , बेन स्टोक्स, सॅैम बिलिंग्स, डेव्हिड विले, लियाम प्लंकेट, रीस टोपले, ख्रिस जॉर्डन, आदील राशिद, लियॉन डॉसन.
हेड टू हेड
आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये एकूण १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले असून, यामध्ये दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व राखताना सात सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने तीन सामन्यांत बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे एक सामना रद्द झाला असून, एक सामना अनिर्णित राहिला आहे.
सामन्याची वेळ
सायंकाळी ७.३० पासून
स्थळ :
वानखेडे स्टेडियम, मुंबई