चॅम्पियन कॅरोलिना मारिनचा केला पराभव

By admin | Published: April 3, 2017 12:31 AM2017-04-03T00:31:37+5:302017-04-03T00:31:37+5:30

सिंधूच्या विजेतेपदामुळे सिरी स्पोर्ट्स संकुलात उपस्थित भारतीय चाहत्यांचा रविवार खऱ्या अर्थाने ‘सुपर संडे’ ठरला.

Champion Carolina Marin defeated | चॅम्पियन कॅरोलिना मारिनचा केला पराभव

चॅम्पियन कॅरोलिना मारिनचा केला पराभव

Next


नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने रविवारी चमकदार कामगिरी करताना आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मारिनचा २१-१९, २१-१६ ने पराभव करीत इंडिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेत महिला एकेरीत प्रथमच जेतेपदाचा मान मिळवला. सिंधूच्या विजेतेपदामुळे सिरी स्पोर्ट्स संकुलात उपस्थित भारतीय चाहत्यांचा रविवार खऱ्या अर्थाने ‘सुपर संडे’ ठरला.
सिंधूने विजेतेपदासह रिओ आॅलिम्पिकच्या अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला.
मायदेशातील चाहत्यांच्या साक्षीने खेळताना सिंधूने या लढतीत वर्चस्व गाजवले. अंतिम लढतीत सिंधूने ४६ मिनिटांमध्ये बाजी मारली. सिंधने या विजयासह स्पेनची प्रतिस्पर्धी मारिनविरुद्धच्या विजयाच्या आकडेवारीत ५-५ अशी बरोबरी केली. सिंधूने यापूर्वी मारिनविरुद्ध गेल्या वर्षी दुबई येथे खेळल्या गेलेल्या बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज स्पर्धेत विजय मिळवला होता.
त्याआधी, डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने चिनी ताईपेच्या टीएन चेन चोऊचा पराभव करीत पुरुष एकेरीत जेतेपदाचा मान मिळवला.
तिसऱ्या मानांकित एक्सेलसेनने सिरी फोर्ट स्पोर्ट््स संकुलात खेळल्या गेलेल्या या लढतीत चोऊचा केवळ ३६ मिनिटांमध्ये २१-१३, २१-१० ने पराभव केला. एक्सेलसेनने प्रथमच या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. त्याआधी, सातव्या मानांकित जपानच्या शिहो तनाका व कोहारू योनेमोटे या जोडीने नाओका फुकुमान व कुरुमी योनाओ या तिसऱ्या मानांकित मायदेशातील सहकारी जोडीचा १६-२१, २१-१९, २१-१० ने पराभव करीत महिला दुहेरीत जेतेपद पटकावले. या लढतीनंतर अव्वल मानांकित चीनच्या सिवेई झेंग व किंगचेन चेन यांनी मायदेशातील सहकारी जोडी व दुसरे मानांकन प्राप्त लु काई व हुआंग याकियोंग यांची झुंज २२-२४, २१-१४, २१-१७ ने मोडून काढत मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावले.
दोन्ही गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासून आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये सिंधूने ६-१ अशी आघाडी घेतली होती, पण मारिनने त्यानंतर पुनरागमन केले. सिंधूने ब्रेकपूर्वी ११-९ अशी आघाडी कायम राखली होती. एकवेळ उभय खेळाडूंदरम्यान १६-१६ अशी बरोबरी होती. मारिनने क्रॉस कोर्ट ड्रॉप शॉटच्या जोरावर गुण वसूल केले. मारिनने त्यानंतर प्रथमच १९-१८ अशी एका गुणाची आघाडी घेतली होती, पण सिंधूने स्मॅशवर गुण वसूल करीत १९-१९ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिंधूने सलग दोन गुण वसूल करीत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने कामगिरीत सातत्य राखले आणि सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. मारिनने त्यानंतर हे अंतर ६-७ असे कमी केले. ब्रेकपर्यंत सिंधूने ११-९ अशी आघाडी घेतली होती. मारिनने त्यानंतर टाळण्याजोगी चूक केल्यामुळे सिंधूने २०-१५ अशी आघाडी घेतली. स्पेनच्या खेळाडूने एक मॅच पॉर्इंट वाचविला, पण सिंधूने पुढच्या क्षणी गुण वसूल करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
>पराभवाचा हिशेब चुकता केला
सिंधू आणि मारिन यांच्यादरम्यानच्या अंतिम लढतीबाबत सर्वांना उत्सुकता होती. ही लढत म्हणजे रिओ आॅलिम्पिकच्या अंतिम लढतीची पुनरावृत्ती होती. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सिंधूने पराभवाचा हिशेब चुकता करणाऱ्या लढतीत शानदार कामगिरी केली. आज सिंधू स्पॅनिश खेळाडूच्या तुलनेत वरचढ ठरली आणि तिने सामन्यावर सुरुवातीपासून नियंत्रण कायम राखले. मारिनने अनेक टाळण्याजोग्या चुका केल्या तर सिंधूने ड्रॉप्स व आक्रमक क्रॉस कोर्ट स्मॅशच्या जोरावर प्रतिस्पर्धी खेळाडूला वरचढ ठरण्याची संधी दिली नाही.
>सिंधू सुपर
२०१७ : इंडियन ओपन :
पी, व्ही. सिंधू सरळ दोन सेटमध्ये विजयी
२०१६ : सुबई वर्ल्ड सुपर सिरीज :
सिंधू सरळ दोन सेटमध्ये विजयी
२०१६ रिओ आॅलिम्पिक : कॅरोलिना तीन सेटमध्ये विजयी
२०१५ डेन्मार्क ओपन सिरीज : सिंधू तीन सेटमध्ये विजयी
२०१५ : सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय गॅ्रण्डप्रीक्स :
कॅरोलिना सरळ दोन सेटमध्ये विजयी
२०१४ : वर्ल्ड चॅम्पियनशिप :
कॅरोलिना सरळ दोन सेटमध्ये विजयी
२०१४ : आॅस्ट्रेलियन ओपन :
कॅरोलिना सरळ दोन सेटमध्ये विजयी
२०११ : मालदिव चॅलेंज : सिंधू तीन सेटमध्ये विजयी
२०१०: वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप :
सिंधू सरळ दोन सेटमध्ये विजयी

Web Title: Champion Carolina Marin defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.