अफगाणिस्तान प्लेट गटात ‘चॅम्पियन’
By admin | Published: February 13, 2016 01:32 AM2016-02-13T01:32:20+5:302016-02-13T01:32:20+5:30
सांघिक व अष्टपैलू खेळाचे शानदार प्रदर्शन करताना अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक स्पर्धेत प्लेट गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी दुसऱ्या
कॉक्सबाजार (बांगलादेश) : सांघिक व अष्टपैलू खेळाचे शानदार प्रदर्शन करताना अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक स्पर्धेत प्लेट गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने दणदणीत विजयासह इंग्लंडवर ७ विकेट्सने मात करून स्पर्धेत पाचव्या स्थानी कब्जा केला.
तारिक स्टेनिकझईने झळकावलेल्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला अनपेक्षित धक्का दिला. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २१६ धावांची मजल मारली. अर्धा संघ ८५ धावांत गमावल्यानंतर यष्टिरक्षक रायन मरे (५३) आणि विलियम मशिंगे (६६) यांच्या निर्णायक अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने दोनशेचा टप्पा पार केला.
झिया उर रेहमान व मुस्लीम मुसा यांनी प्रत्येकी ३ बळी घेत झिम्बाब्वेला रोखले. यानंतर सावध सुरुवात करताना अफगाणिस्तानने ४६.५ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. दुसऱ्या बाजूला फतुल्लाह येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा ७ विकेट्सने धुव्वा उडवून पाचव्या स्थानी बाजी मारली. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानने केवळ ३ फलंदाज गमावून इंग्लंडला नमवले. सलामीवीर झीशान मलिकने (९३) महत्त्वपूर्ण खेळी करताना संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याचे शतक ७ धावांनी हुकले, तर अखेर सैफ बदर (नाबाद ७५) व हसन मोहसीन (नाबाद ३९) यांनी विजयावर शिक्का मारला.