आॅलिम्पिकमधील बदलाने वातावरणावर परिणाम होईल
By admin | Published: February 8, 2017 11:47 PM2017-02-08T23:47:49+5:302017-02-08T23:47:49+5:30
भविष्यात आॅलिम्पिकसाठी आयएसएसएफ अॅथलिट आयोगाच्या मिश्र संघाच्या शिफारशीला वैश्विक संस्थेने मान्यता दिल्यास त्याचा नेमबाजीच्या वातावरणाला जोरदार धक्का बसेल
नवी दिल्ली : भविष्यात आॅलिम्पिकसाठी आयएसएसएफ अॅथलिट आयोगाच्या मिश्र संघाच्या शिफारशीला वैश्विक संस्थेने मान्यता दिल्यास त्याचा नेमबाजीच्या वातावरणाला जोरदार धक्का बसेल, असे आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त नेमबाज गगन नारंगने म्हटले.
या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भारताचा एकमेव वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णविजेता अभिनव बिंद्रा याच्या अध्यक्षतेखालील आयएसएसएफ अॅथलिट समितीने आॅलिम्पिकसाठी संमिश्र सांघिक स्पर्धेची शिफारस केली आहे.पॅनलने डबल ट्रॅप पुरुष स्पर्धेच्या जागी मिश्र ट्रॅप स्पर्धा याशिवाय ५० मीटर प्रोन पुरुष स्पर्धेला मिश्र एअर रायफल स्पर्धा आणि ५० मीटर पिस्टल स्पर्धेला मिश्रित एअर पिस्टल स्पर्धेत परिवर्तित करण्याची मागणी केली आहे.
नारंग म्हणाला, ‘‘नेमबाजी खेळाच्या वातावरणाला या तीन स्पर्धांच्या आॅलिम्पिकमधून हटवल्यास मोठा धक्का बसेल.’’ तथापि, नारंग याविषयी दु:खी नसून तो ते अवलंबण्यास तयार आहे. याविषयी सविस्तर सांगताना नारंग म्हणाला, ‘‘पूर्ण जगात प्रोन स्पर्धा खूप लोकप्रिय आहे आणि ते हटवल्यास जे नेमबाज फक्त प्रोनमध्येच नेमबाजी करीत आहेत, ते बाहेर होतील. त्याचप्रमाणे ५० मीटर प्रोन आणि ५० मीटर पिस्टलसाठी आवश्यक साहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांना ते साहित्य बंद लागेल.’’