अर्जुन पुरस्कारांचे नियम बदलणार, राष्ट्रीय पात्रता नियमात बदलाच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 04:07 AM2017-08-22T04:07:41+5:302017-08-22T04:08:53+5:30
अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे.
क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पात्रता नियमात बदल करण्याबाबत पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले, की निवड समितीच्या विश्वसनीयतेवर कुठलीही शंका घेण्यात आली नाही. याशिवाय पारदर्शीपणा जपण्याचा निर्णय झाला आहे. समितीत नेहमी प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असतो. पण पुढील वर्षी योजनेत संशोधन होईल. लवकरच नवे निर्देश निघतील. यानुसार ज्या खेळाडूंच्या नावाची शिफारस झाली नसेल किंवा संबंधित महासंघाने त्याचे नाव पाठविले नसेल तरीही त्या खेळाडूच्या कामगिरीची दखल घेत पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
रोहन बोपन्नासारखा वाद टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे का, असा सवाल करताच हा अधिकारी म्हणाला, ‘चांगल्या अणि सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही बोपन्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. जुनी पद्धत सुधारण्याची ही प्रक्रिया समजा. एखाद्या व्यक्तीशी संबंधित हे प्रकरण नाही. एकूणच पद्धत सुधारण्याची गरज असल्याने समितीलादेखील सुधारणा पटतील.’
जूनमध्ये फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकविणाºया बोपन्नाच्या नावाची शिफारस एआयटीएने क्रीडा मंत्रालयाकडे केली नव्हती. वेळ निघून गेल्यानंतर २८ एप्रिल रोजी त्याचे नाव पाठविण्यात आले होते.
मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज बनली. तिला खेलरत्न देण्याची मागणी पुढे आली, पण तिचे नाव पुरस्कारासाठी पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे समितीला तिच्या नावाचादेखील विचार करता आला नाही. समितीच्या एका सदस्याने ३ आॅगस्ट रोजी बैठकीपूर्वी मितालीच्या नावावर चर्चा होऊ शकते काय, असा प्रश्न उपस्थित केल्याची माहिती पुढे आली आहे. बीसीसीआय किंवा कुठल्याही अन्य संघटनेने मितालीची शिफारस केली नसल्याने चर्चा होऊ शकत नसल्याचे ‘त्या’ सदस्याला सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
प्रचलित नियमानुसार खेळाडूंना विश्वकप, विश्वचॅम्पियनशिप, आशियाई स्पर्धा, आशियाड, राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा, तसेच राष्टÑकुल चॅम्पियनशिपमधील कामगिरीच्या आधारे गुण दिले जातात. गुण देण्याच्या पद्धतीत मंत्रालय सुधारणा करते काय, हे पाहणेदेखील रंजक ठरणार आहे...
नव्या पात्रता निकषामुळे समितीच्या प्रत्येक सदस्याला पुरस्कारायोग्य असलेल्या पण शिफारस न झालेल्या खेळाडूच्या नावाचा विचार करता येईल. सदस्याच्या सल्ल्यामुळे संबंधित खेळाडू पुरस्कारायोग्य आहे का, हे समितीला पडताळून पाहता येईल...