डीआरएसच्या नियमात बदल

By admin | Published: July 4, 2016 05:42 AM2016-07-04T05:42:36+5:302016-07-04T05:42:36+5:30

आयसीसीने पायचितसाठी वापरण्यात येणाऱ्या डीआरएसच्या नियमांमध्ये बदल करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.

Changes to the rules of the DRS | डीआरएसच्या नियमात बदल

डीआरएसच्या नियमात बदल

Next


एडिनबर्ग : आयसीसीने पायचितसाठी वापरण्यात येणाऱ्या डीआरएसच्या नियमांमध्ये बदल करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये दोन गट, नव्या वन-डे लीगसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या योजनांना स्थगिती देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची शनिवारी रात्री बैठक झाली. त्यात आयसीसी, आयडीआय आणि आयबीसी बोर्डांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व आता आयसीसी चेअरमन असलेल्या शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली अनेक बाबींवर चर्चा केली आणि काही महत्त्वाचे निर्णयही घेतले.
आयसीसीने स्पष्ट केले, ‘‘जागतिक संस्थेच्या प्रशासनामध्ये पुनर्गठन करण्याबाबत प्रगती झाली आहे, तर डरबनमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. क्रिकेटचा आॅलिम्पिक खेळामध्ये समावेश करण्याच्या आयसीसीच्या योजनेवरही चर्चा झाली.
आयसीसीने म्हटले, ‘‘याची चाचणी आगामी वन-डे मालिकांदरम्यान घेण्यात येईल. तिसरा पंच चेंडू पडल्यानंतर काही सेकंदांमध्ये नोबॉलचा निर्णय घेईल आणि तो मैदानावरील पंचांना कळवेल. याचे अंतिम स्वरूप निश्चित झाल्यानंतर चाचणीबाबतची विस्तृत माहिती देण्यात येईल.’’
दरम्यान, बांगलादेशसारख्या देशांचे संघ स्थायी स्वरूपात ‘सेकंड डिव्हिजन’मध्ये जाण्याचा धोका असल्यामुळे आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल करण्याची योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये मुख्यालयात कार्यशाळा आयोजिण्यात येणार आहे.
आयसीसीने म्हटले, ‘‘आयसीसीच्या मुख्य कार्यकारिणीच्या समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्वरूपात आणि तीन प्रकारच्या क्रिकेटमध्ये नव्या स्पर्धा सुरू करण्याबाबत चर्चा केली. कुठल्याही प्रकारचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी याबाबत सविस्तर माहिती घेणे आवश्यक असल्याचे सर्व सदस्यांचे मत पडले.’’
आयसीसीने पुनर्गठन करण्याच्या मुद्यावर बोलताना सांगितले, की आयसीसी बोर्डाच्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये प्रस्ताव ठेवण्यासाठी आगामी आठवड्यांमध्ये घटनेमध्ये काय बदल करायचा, याचे रफ स्केच तयार करण्यात येईल.
आयसीसीने राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या प्रस्तावानंतर डरबनमध्ये २०२२ ला होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयसीसी अर्ज देणार आहे.
भ्रष्टाचारविरोधी समितीचे अध्यक्ष सर रोनी फ्लॅगनन यांनी वार्षिक कार्याची माहिती दिली. त्यात एकीकृत कार्यकारी समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचा समावेश आहे. बार्बाडोसमध्ये यापूर्वीच्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीमध्ये याला मंजुरी प्रदान करण्यात आली होती.
बोर्डाने आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा करार वाढविण्यास मंजुरी प्रदान केली. आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी २०१९ च्या वार्षिक बैठकीपर्यंत या भूमिकेत राहण्याची तयारी दर्शवली. (वृत्तसंस्था)
>पायचितवर पंचांच्या निर्णयाबाबत डीआरएसचा अवलंब करण्यात आला आणि मैदानावरील पंचांच्या निर्णयात बदल करण्यात आला, तर चेंडूचा अर्धा भाग यष्टीच्या विभागात असणे आवश्यक आहे. त्यात उजव्या व डाव्या यष्टीच्या बाहेरच्या भागाचा समावेश आहे. यापूर्वी चेंडूचा अर्धा भाग उजव्या किंवा डाव्या यष्टीच्या मधल्या भागात असणे आवश्यक होते. बदललेल्या नियमाचा अवलंब १ आॅक्टोबर किंवा या तारखेपूर्वी सुरू होणाऱ्या आणि डीआरएसचा वापर होणाऱ्या कुठल्याही मालिकेत लागू राहील.
या बदललेल्या नियमाचा गोलंदाजांना अधिक लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे मैदानावरील पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे वळता करण्यात आल्यानंतर अधिक फलंदाजांना बाद ठरविण्यात येईल. कारण यापूर्वी यष्टीच्या बाहेरच्या भागाला लागणाऱ्या चेंडूंबाबतच्या निर्णयामध्ये अनेकदा बदल करण्यात येत होता.’’
नोबॉलच्या निर्णयाबाबत आयसीसीने स्पष्ट केले, ‘‘मैदानी पंचांऐवजी तिसऱ्या पंचांना नोबॉल ठरवण्याची परवानगी देण्याचा प्रयोग आगामी काही महिन्यांमध्ये करण्यात येणार आहे. तिसरा पंच रिप्ले बघितल्यानंतर नोबॉलबाबत अचूक निर्णय देऊ शकतो का, याची चाचणी घेण्यात येईल.’’

Web Title: Changes to the rules of the DRS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.