‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखली!
By admin | Published: May 13, 2015 12:18 AM2015-05-13T00:18:54+5:302015-05-13T00:18:54+5:30
टॉप वनच्या दिशेने भरधाव धावणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई ‘एक्स्प्रेस’ ला दिल्लीने अवघ्या ६ बाद ११९ धावांवर रोखले.
रायपूर : टॉप वनच्या दिशेने भरधाव धावणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई ‘एक्स्प्रेस’ ला दिल्लीने अवघ्या ६ बाद ११९ धावांवर रोखले. टिच्चून गोलंदाजी आणि तितकेच शानदार क्षेत्ररक्षण हे दिल्लीचे वैशिष्ट्य ठरले. झहीर खान आणि अॅल्बी मोर्केल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. चेन्नईकडून ड्यु प्लेसिसने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली.
शहिद वीर नारायणसिंग मैदानावरील आयपीएलच्या या ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीच्या या निर्णयास दिल्लीच्या गोलंदाजांनी आव्हान दिले. इतर वेळी आक्रमक सुरुवात करणारी ड्वेन स्मिथ आणि ब्रँडन मॅक्यूलम ही जोडी आज चाचपडताना दिसली. सहाव्या षटकापर्यंत त्यांनी केवळ १६ धावाच काढल्या होत्या. झहीर खानने मॅक्क्यूलम जेपी ड्युमिनीकरवी झेलबाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर नवव्या षटकांत मोर्कलने स्मिथला पायचित केले. सुरेश रैनाला सुद्धा आज विशेष योेगदान देता आले नाही. तो ११ धावा काढून तंबूत परतला. यामध्ये त्याच्या एका चौकाराचा समावेश आहे. यादवच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो ड्युमिनीकरवी झेलबाद झाला. त्यानंतर ड्यु प्लेसिस आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चेन्नईला सावरले. तसेच धावगती वाढवण्याचाही प्रयत्न केला. मात्र दिल्लीची भेदक गोलंदाजी त्यांना अडचणीची ठरली. ड्यु प्लेसिसने २३ चेंडूंत सर्वाधिक २९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ३ चौकारांचा समावेश आहे. धोनी-प्लेसिसने चौथ्या गड्यासाठी ३७ धावांची भागीदारी केली. चेन्नई ११ व्या षटकांत अर्धशतक पूर्ण केले. प्लेसिस चांगला खेळत होता मात्र दिल्लीचा हा मोठा अडथळा मोर्केलने त्रिफळा उडवत दूर केला. त्यानंतर धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी संघाचे शतक पूर्ण केले. एक षटकार आणि ३ चौकार ठोकणारा महेंद्र सिंग धोनी झहीर खानच्या चेंडूवर मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्याने २७ धावा केल्या. ब्राव्हो (८), पवन नेगी (नाबाद ५), रवींद्र जडेजा (नाबाद ३) यांनी संघाला ११९ धावसंख्येपर्यंत आणले.
दुसरीकडून, दिल्लीच्या गोलंदाजांना उत्कृष्ट भूमिका बजावली. झहिर खानने ४ षटकांत अवघ्या ९ धावा देत २ बळी घेतले. त्याला मोर्केलने २ बळी घेत उत्कृष्ट साथ दिली. गुरिंदर संधू आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)