चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स ठरले ‘नाबाद’

By admin | Published: October 18, 2015 11:19 PM2015-10-18T23:19:38+5:302015-10-19T03:19:58+5:30

इंडियन प्रीमिअर लीगमधून (आयपीएल) निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रॅन्चाईजींच्या भविष्याविषयी सुरू असलेल्या

Chennai Super Kings and Rajasthan Royals 'unbeaten' | चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स ठरले ‘नाबाद’

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स ठरले ‘नाबाद’

Next

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमधून (आयपीएल) निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रॅन्चाईजींच्या भविष्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०१८ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये या दोन्ही संघांचे पुनरागमन होणार असल्याचे शिक्कामोर्तब केले.
मुंबईत रविवारी झालेल्या आपल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये बीसीसीआयने हा निर्णय घेतला. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायाधीश आर. लोढा समितीद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनुसारच या दोन्ही संघांवरील निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, पुढील दोन वर्षी होणारी आयपीएल स्पर्धा आठ संघांतच होणार असल्याचा निर्णय घेताना यासाठी दोन नव्या संघांचा समावेश करण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे. मात्र २०१८ मध्ये चेन्नई आणि राजस्थान यांच्या पुनरागमनानंतर हीच स्पर्धा आठ संघांत होईल की दहा संघांत याबाबतीत मात्र अद्याप बीसीसीआयकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही.
दरम्यान, या बैठकीत बीसीसीआयने वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ९ नोव्हेंबरला मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली, की २०१८ मध्ये आयपीएलमध्ये किती संघ असतील, याबाबतचा निर्णय एजीएममध्ये घेण्यात येईल. तसेच या वेळी पाकिस्तानसह द्विपक्षीय मालिका यांसारख्या काही महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होईल.
आयपीएलमधील नव्या दोन संघांबाबत बीसीसीआयने सांगितले, की यासाठी दोन नव्या निविदा काढण्यात येतील. यामुळे चेन्नई आणि राजस्थान यांच्या अनुपस्थितीमध्ये ही स्पर्धा आठ संघांतच पार पडेल. बीसीसीआय कार्यकारिणी समितीने हा निर्णय आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर, माजी भारतीय कर्णधार व ‘कॅब’ अध्यक्ष सौरव गांगुली आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश असलेला आयपीएल कार्यसमूहाच्या सूचनांनुसार घेतला आहे.
न्यायाधीश लोढा समितीने दिलेल्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे स्पष्ट करून बीसीसीआयने सांगितले, की चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स दोन वर्षांसाठी निलंबित राहतील. त्यामुळे पुढील दोन आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश करण्यासाठी निविदा काढण्यात येतील. २०१३ च्या स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या या दोन्ही संघांना बरखास्त करण्याच्या निर्णयाला बीसीसीआयच्या बहुतेक सदस्यांचा नकार होता. (क्रीडा प्रतिनिधी)
>>>>>>१बीसीसीआयने आपल्या बैठकीत आगामी आयपीएल सत्रांसाठी पेप्सिकोऐवजी मोबाईल कंपनी वीवोची टायटल प्रायोजक म्हणून निवड केली. २०१७ मध्ये पेप्सिकोसोबतचा टायटल प्रायोजक करार संपुष्टात येणार होता. मात्र मधेच पेप्सिकोने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने बीसीसीआयने विवोची निवड केली. त्याचवेळी बीसीसीआयने पुढील १० दिवसांत वीवोला बँक गॅरंटी द्यावी लागेल, असेही स्पष्ट केले. २०१३ मध्ये ३९६ करोड ८० लाख रुपयांची बोली लावून पेप्सिको पाच सत्रांसाठी आयपीएलचे टायटल प्रायोजक बनले होते.
२आर्थिक व्यवहारामध्ये अधिक पारदर्शीपणा आणण्यासाठी बीसीसीआय पेन्शनधारी माजी खेळाडू आणि पंचांच्या नावांची यादी आपल्या संकेतस्थळावर अपडेट करणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी केलेल्या घोषणेनुसार २५ लाखांपेक्षा अधिक करण्यात आलेल्या कोणत्याही खर्चाची माहिती संकेतस्थळावर अपडेट करण्यात येणार आहे. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बीसीआयकडून मासिक पेन्शन घेणारे माजी खेळाडू व पंचांची यादी आणि रक्कम तसेच बीसीसीआयकडून ‘वनटाइम बेनिफिट’ घेतलेल्या खेळाडूंची यादी व रक्कम संकेतस्थळावर टाकण्यात येईल.
३बीसीसीआयने मेसर्स गोखले अ‍ॅण्ड साठ्ये कंपनीला अंतरिम आॅडिटर म्हणून नियुक्त केले असून ही कंपनी मेसर्स पीबी विजयराघवन अ‍ॅण्ड कंपनीची जागा घेईल. त्याचवेळी राज्य संघांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा किती व कसा वापर झाला, याचा लेखाजोखा ठेवण्याची जबाबदारी बीसीसीआयने प्राइस वॉटर हाऊस कूपरची स्वतंत्र एजन्सी म्हणून नियुक्ती केली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला ‘सेंटर फॉर एक्सीलन्स’ रुपातून नवजीवन देणार असूनही बोर्डाची मुख्य प्राथमिक जबाबदारी असेल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.

Web Title: Chennai Super Kings and Rajasthan Royals 'unbeaten'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.