पंजाबसमोर चेन्नईचे आव्हान
By admin | Published: May 16, 2015 02:25 AM2015-05-16T02:25:53+5:302015-05-16T02:25:53+5:30
आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ आणि दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज शनिवारी आयपीएल-८ च्या अखेरच्या लढतीत प्ले आॅफबाहेर
मोहाली : आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ आणि दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज शनिवारी आयपीएल-८ च्या अखेरच्या लढतीत प्ले आॅफबाहेर झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
उभय संघांत आतापर्यंत जे १६ सामने झाले त्यांत चेन्नईने ८ सामने जिंकले. सहा सामन्यांत पंजाबला विजय मिळाला. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. सध्याच्या स्पर्धेत २५ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबला ९७ धावांनी धूळ चारली होती.
दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पराभूत झालेला चेन्नई संघ उद्या पंजाबला कमकुवत मानण्याची मात्र चूक करणार नाही. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २२ धावांनी विजय साजरा केल्यानंतर उत्साहाचा संचार झालेला पंजाब चेन्नईचे गणित चुकविण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आकडेवारीवर नजर टाकल्यास चेन्नईचे पारडे जड वाटते. आयपीएल-७ मध्ये उभय संघ तीन सामन्यांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. त्यात चेन्नईला एकही विजय साजरा करता आला नाही. क्लालिफायरमध्ये पंजाबने चेन्नईवर २४ धावांनी विजय साजरा केला होता. त्याआधी कटकमध्ये झालेल्या लढतीतही पंजाबने ४४ धावांनी सरशी साधली होती.
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ १३ सामन्यांत ८ विजयांसह १६ गुण घेऊन आघाडीवर आहे. पंजाब संघ १३ पैकी १० सामन्यांत पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर झाला. पंजाबला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळू शकतो; मात्र चेन्नईचे खेळाडू कुठल्याही मैदानावर खेळून विजय खेचून आणतात. चेन्नईचा बें्रडन मॅक्युलम हा धावा काढण्याशिवाय क्षेत्ररक्षणातही अप्रतिम कामगिरी करीत आहे. त्याने १३ सामन्यांत ४३० धावा केल्या. पंजाबचा एकमेव फलंदाज डेव्हिड मिलर याने १२ सामन्यांत ३४६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ड्वेन ब्राव्हो आयपीएलच्या आठव्या पर्वात सर्वाधिक १९ गडी बाद करणारा गोलंदाज बनला. पाठोपाठ आशिष नेहरा १७ गडी बाद करून दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचे गोलंदाज अनुरितसिंग व अक्षर पटेल यांनी क्रमश: १५ आणि १३ गडी बाद केले.
चेन्नई गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही आघाडीवर आहे. मॅक्युलमशिवाय धोनी, ब्राव्हो आणि डुप्लेसिस, सुरेश रैना, जडेजा व आश्विन हे सर्व जण धावा काढण्यात पटाईत मानले जातात. (वृत्तसंस्था)