बुध्दिबळ : आर्मेनियाचा ग्रँड मास्टर पेट्रोस्यांन मॅनुएल आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 11:15 PM2019-06-15T23:15:29+5:302019-06-15T23:16:12+5:30
द्वितीय मानांकित ग्रँडमास्टर फारूखने शानदार विजय मिळवून ६.५ गुणासह द्वितीय आघाडीत झेप घेतली.
मुंबई : दहावा मानांकित आर्मेनियाचा ग्रँड मास्टर पेट्रोस्यांन मॅनुएलने (इलो २५७३) दुसऱ्या पटावर अठरावा मानांकित चिलीचा ग्रँड मास्टर रॉड्रिगो वास्केझचा (इलो २४७६) ३१ चालीत पराभव करून सर्वाधिक साखळी ७ गुणांची नोंद केली आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व व्हिनस चेस अकादमी आयोजित मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय अ विभाग बुद्धिबळ स्पर्धेच्या दहा पैकी आठव्या साखळी फेरी अखेर एकमेव आघाडी घेतली. द्वितीय मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर अमोनातोव फारूख (इलो २६२४), तृतीय मानांकित जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पँटसुलिया लेवन (इलो २६१४), चौथा मानांकित आर्मेनियाचा ग्रँड मास्टर सॅमवेल तेर-सहक्यान (इलो २६११), बारावा मानांकित जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पैचाड्झे लका (इलो २५५७ ), तेरावा मानांकित ब्राझिलचा ग्रँड मास्टर अलेक्झांडर फियर (इलो २५४३), चौदावा मानांकित युक्रेनचा ग्रँड मास्टर तुखाईवने (इलो २५२७) यांचे साखळी ६.५ गुण झाले असून संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत माउंट लिटेरा स्कुल इंटरनॅशनल संस्थेच्या सहकार्याने बीकेसी येथे सुरु असलेल्या अ विभाग बुध्दिबळ स्पर्धेच्या साखळी आठव्या फेरीमधील पहिल्या पटावर आर्मेनियाचा ग्रँड मास्टर सॅमवेल तेर-सहक्यान (इलो २६११) विरुद्ध तेरावा मानांकित ब्राझिलचाग्रँड मास्टर अलेक्झांडर फियर (इलो २५४३) यांच्यातील डाव बराच वेळ लांबला. सिसिलियन डिफेन्समधील तैमॅनोव्ह विविधतेच्या विरूद्ध खेळताना ग्रँड मास्टर सॅमवेलने किंचित आघाडी मिळवली. जेव्हा त्याला आक्रमण करण्याची संधी मिळाली, त्याच वेळी १२ व्या चालीत ग्रँड मास्टर अलेक्झांडर फियरने वजीरा वजीरी करून बरोबरी साधली. त्यानंतरच्या चालीत एकामागून एक मोहऱ्यांची अदलाबदल करत ३२ व्या चालीपर्यंत दोघांकडे फक्त हत्ती राहिल्याने बरोबरीची स्थिती निर्माण झाली. ६३ चालीनंतर फक्त पटावर राजे राहिल्यानंतर डाव बरोबरीत सुटला.
दुसऱ्या पटावर ग्रँड मास्टर पेट्रोस्यांन मॅनुएलने (इलो २५७३) दुसऱ्या पटावर अठरावा मानांकित चिलीचा ग्रँड मास्टर रॉड्रिगो वास्केझ (इलो २४७६) विरुद्ध पांढऱ्या मोहरानी खेळताना क्वीन्स गॅबिट प्रकाराने डावाची सुरवात केली. ते ग्रँड मास्टर रॉड्रिगोने नाकारून विषयबद्ध 'ई ५' ब्रेक व्यवस्थापित केला आणि ९व्या चालीनंतर आरामशीरपणे बरोबरी साधली. नंतरच्या काही चालीत, एक मजेदार ग्रीक गिफ्ट बलिदानाचा त्याग करून रॉड्रिगोने हल्ला केला आणि आपला हत्ती वर नेला. पण ग्रँड मास्टर पेट्रोस्यांन मॅनुएलने सुनियोजित प्रतिहल्ला करून त्या हत्तीला जेरबंद केले. अखेर त्याचा बळी मिळवून ३१ चालीत विजय संपादन केला.
तिसऱ्या पटावर अर्ध्या गुणांसह लढत बरोबरीत सोडवून बारावा मानांकित जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पैचाड्झे लकाने (इलो २५५७ ) साखळी ६.५ गुण तर प्रथम मानांकित व्हेनेझुएलाचा ग्रँडमास्टर ईतूरिझगा बोनेलीने (इलो २६३७) साखळी ६ गुण नोंदविले. चौथ्या पटावर मात्र द्वितीय मानांकित ग्रँडमास्टर फारूखने शानदार विजय मिळवून ६.५ गुणासह द्वितीय आघाडीत झेप घेतली. त्याच्या विरुद्ध बांगलादेशचा ग्रँड मास्टर झियाऊर रेहमानने सिसिलियन बचाव पद्धतीचा अवलंब केला. कॅसलिंग न करता आपल्या राजाला पटाच्या मध्यावर ठेवण्याची चूक झियाऊरला भोवली आणि त्याला २ हत्तींच्या बदल्यात वजिराचा बळी द्यावा लागला. फारुखने आपल्या वजीर व उंटाच्या सहाय्याने अप्रतिम आक्रमण करून डाव ३७ चालीत सहजपणे जिंकला. स्पर्धेच्या अजून २ फेऱ्या बाकी असून विजेतेपदासाठी १६ जूनला जोरदार चुरस असेल.