महापौर बुध्दिबळ: मार्टिनला अर्जुनने बरोबरीत रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 09:12 PM2018-06-06T21:12:15+5:302018-06-06T21:12:15+5:30
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी पाचव्या फेरीत प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनला भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनने बरोबरीत रोखले.
मुंबई : मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी पाचव्या फेरीत प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनला भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनने बरोबरीत रोखले तर भारताचा फिडे मास्टर राजा रीथ्विकने युक्रेनचा ग्रँडमास्टर नेवेरोव वालेरीयवर मात केली.दोघा भारतीयांनी या नेत्रदीपक कामगिरीमुळे ४.५ गुणासह ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिन, तृतीय मानांकित ग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुख, पंधरावा मानांकित ग्रँडमास्टर तरान तुअन मिन्ह यांच्यासोबत संयुक्त पहिल्या स्थानाची आघाडी घेतली.
महापौर चषक आंतरराष्ट्रीय अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील पहिल्या पटावर ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिन विरुध्द फिडे मास्टर एरीगीसी अर्जुन यामधील लढत फ्रेंच डिफेन्स पद्धतीने सुरु झाली. दोघांनी एकमेकांना अजमविण्याचे डावपेच रचूनही अखेर ४२ व्या चालींला बरोबरी मान्य केली. दुसऱ्या पटावर क्वीन्स इंडियन डिफेन्सने सुरु झालेल्या लढतीमध्ये चौथा मानांकित ग्रँडमास्टर रोझुम इवान विरुद्ध पंधरावा मानांकित तरान तुअन मिन्हने ७२ व्या चालीला बरोबरी साधली. भारताचा फिडे मास्टर राजा रीथ्विकने ग्रँडमास्टर नेवेरोव वालेरीयचा चुरशीचा पराभव करून साखळी एक गुण वसूल केला. राजा रीथ्विकची बाजू किंचीतसी वरचढ असतांना ३० व्या चालीला नेवेरोव वालेरीयने डाव बरोबरीत सोडविण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु रीथ्विकने कोणताही धोका न पत्करता आक्रमणाची धार वाढवीत अखेर ७६ व्या चालीला प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. संयुक्त आघाडीच्या दुसऱ्या स्थानावर ४ गुणांसह चौथा मानांकितग्रँडमास्टर रोझुम इवान, सहावा मानांकित भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदा आदी २२ बुध्दिबळपटू आहेत.