आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाड; भारतीय खेळाडूंवर सर्वांची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:13 AM2022-07-28T06:13:48+5:302022-07-28T06:14:39+5:30
पाच वेळचा विश्वविजेता दिग्गज विश्वनाथन आनंद यंदा खेळणार नसल्याने भारताची बाजू थोडी कमजोर झाली आहे.
मामल्लापुरम : काही आघाडीच्या संघांच्या अनुपस्थितीत गुरुवारपासून रंगणाऱ्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत यजमान भारत पदकाचा संभाव्य दावेदार म्हणून खेळेल. जागतिक बुद्धिबळमध्ये वर्चस्व राखणारे रशिया व चीन यांचे संघ यंदा सहभागी होणार नाहीत. यंदा भारताने खुल्या व महिला गटात प्रत्येकी ३ संघ खेळविले आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष भारतीयांच्या चालींवर लागलेले असेल.
पाच वेळचा विश्वविजेता दिग्गज विश्वनाथन आनंद यंदा खेळणार नसल्याने भारताची बाजू थोडी कमजोर झाली आहे. मात्र, आनंद भारतीय संघाला मार्गदर्शन करणार असल्याने भारताला त्याच्या अनुभवाचा फायदा होईल. भारत अ संघाला अमेरिकेनंतर दुसरे मानांकन लाभले आहे. युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारत ब संघाला ११वे मानांकन लाभले आहे. या संघाला डार्कहॉर्स मानले जात असून या संघातील खेळाडू कोणत्याही खेळाडूला धक्का देण्याची क्षमता राखून आहेत.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यंदा खुल्या गटात विक्रमी १८८ संघ आणि महिला गटात १६२ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये सहा संघ भारताचे आहेत. यजमान असल्याने भारताला अतिरिक्त संघ खेळविण्याचा फायदा मिळाला आहे. रशिया आणि चीन यांच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेतील आव्हान काहीसे सोपे झाले असून, अन्य संघातील खेळाडूंना आपली छाप पाडण्याची मोठी संधी मिळाली आहे.
यंदा ठरणार का किंग?
भारताने यंदा सुवर्ण पदक पटकावण्याचा निर्धार केला असून त्यादृष्टीने सर्व तयारी केली आहे. २०१४ साली नॉर्वेतील ट्रॉमसो येथे झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने कांस्य जिंकले होते. २०२० मध्ये झालेल्या ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये भारतीयांनी रशियासह संयुक्तपणे विजेतेपद पटकावले होते. तसेच त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा एकदा भारताने कांस्य पदक पटकावले होते.