बुद्धिबळ : पार्थसारथीची ग्रँडमास्टर घोषवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 08:59 PM2018-06-05T20:59:25+5:302018-06-05T20:59:25+5:30
बिगरमानांकित पार्थसारथी आर.ने भारताचा ग्रँडमास्टर दिप्तायण घोषवर मात करून धक्कादायक विजयाची नोंद केली.
मुंबई : बिगरमानांकित पार्थसारथी आर.ने (इलो १९१६) अकराव्या मानांकित भारताचा ग्रँडमास्टर दिप्तायण घोषवर (इलो २५३६) मात करून मुंबईमहापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी तिसऱ्या फेरीत धक्कादायक विजयाची नोंद केली. व्हीनस चेस अकॅडमीतर्फे मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटना आयोजित अन्य सामन्यात प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिन, तृतीय मानांकितग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुख, चौथा मानांकित ग्रँडमास्टर रोझुम इवान, भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांनी विजयीदौड कायम राखत ३ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे.
बीकेसी येथील माउंट लिटर स्कूल इंटरनॅशनल सभागृहामधील महापौर चषक आंतरराष्ट्रीय अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील पाचव्या पटावर काळ्या मोहरानी मॉर्डन डिफेन्स पद्धतीने सुरुवात करीत पार्थसारथीने डावाच्या मध्यापर्यंत खेळ बरोबरीत राखला होता. दिप्तायणने शेवटच्या काही चालीत एक हत्ती व उंट यांच्याविरुद्ध दोन हत्ती अशी मजबूत स्थिती निर्माण केली होती. परंतु दिप्तायणने राजाची एक चुकीची खेळी केल्यामुळे प्रतिस्पर्ध्याला त्याचा हत्ती फुकट मिळाला. त्याचा लाभ उठवून पार्थसारथीने अचूक खेळ करीत डावावर विजय मिळविला.
पहिल्या पटावर प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनने १८ व्या चालीत प्रणेश एम.चे आव्हान संपुष्टात आणले. मार्टिनने इंग्लिश पद्धतीने सुरुवात करून १० व्या चालीपासून डावावर मजबूत पकड बसविली होती. तृतीय मानांकित ग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुखला विजयासाठी ४९ व्या चालीपर्यंत मृदुल देहान्करने झुंजविले. मृदुलने २८ व्या चालीपर्यंत डावामध्ये बरोबरी साधली होती. परंतु फारुखच्या दीर्घ अनुभवापुढे निभाव लागला नाही. चौथ्या पटावर भारताचा नामांकित ग्रँडमास्टर संदीपन चंदाने काळ्या मोहरानी खेळतांना जम्मू काश्मीरच्या मीनल गुप्तावर ४२ चालीत विजय मिळविला. संदीपनने सिसिलियन बचाव पद्धतीचा वापर करून १७व्या चालीपासून आघाडी घेतली. त्याने मोहरांची अदलाबदल करीत ४२व्या चालीला विजय नोंदविला.