चेतेश्वर पुजाराचे दमदार द्विशतक
By Admin | Published: September 12, 2016 12:42 AM2016-09-12T00:42:38+5:302016-09-12T00:42:38+5:30
भरवशाचा चेतेश्वर पुजारा याने केलेली नाबाद २३५ धावांची दमदार द्विशतकी खेळी आणि शेल्डॉन जॅक्सनचा (१३४) शतकी तडाखा या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप ट्रॉफीच्या
ग्रेटर नोएडा : भरवशाचा चेतेश्वर पुजारा याने केलेली नाबाद २३५ धावांची दमदार द्विशतकी खेळी आणि शेल्डॉन जॅक्सनचा (१३४) शतकी तडाखा या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंडिया रेडविरुद्ध दुसऱ्या दिवशी १५८ षटकांत ६४५ धावांची मजबूत धावसंख्या उभारली आहे. विशेष म्हणजे पुजारा व जॅक्सन यांनी पाचव्या विकेटसाठी २४३ धावांची भागीदारी करून रेड संघाला चांगलेच दमवले.
पुजाराने ३४० चेंडूंत तब्बल २६ चौकार मारताना नाबाद २३४ धावा काढल्या आहेत. पुजाराने यासह आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीमध्ये १० हजार धावांचा टप्पाही पार केला, तर जॅक्सन २०४ चेंडंूत १५ चौकार व २ षट्कारांसह १३४ धावा काढून बाद झाला. जॅक्सनने देखील यावेळी आपल्या प्रथम श्रेणीमध्ये ३ हजार धावा पूर्ण केल्या.
दुसऱ्या दिवशी ३ बाद ३६२ धावांवरून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्याच षटकात ५५ धावांवर खेळत असलेला दिनेश कार्तिक वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मात्र, यानंतर पुजारा-जॅक्सन यांनी संघाला केवळ सावरलेच नाही, तर मजबूत स्थितीमध्ये आणले. पुजाराने आपले ३३ वे प्रथमश्रेणी शतक झळकावले, तर जॅक्सनने ११ वे प्रथम श्रेणी शतक झळकावले. या दोघांच्याही तडाख्यापुढे रेड संघाचे सर्वच गोलंदाज हतबल झाले.
परंतु, फिरकी गोलंदाज अमित मिश्राने महत्त्वपूर्ण कामगिरी करताना १५०व्या षटकात आपल्या गोलंदाजीवर जॅक्सनला झेलबाद करून संघाला मोठे यश मिळवून दिले. यानंतर खेळपट्टीवर आलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने पुजाराला योग्य साथ देताना आक्रमक फलंदाजी केली. जडेजा २६ चेंडंूत प्रत्येकी एक चौकार व षट्कारासह नाबाद २२ धावांवर खेळत आहे. अमित मिश्राने १६६ धावांत २ बळी घेतले असून, प्रदीप सांगवान, स्टुअर्ट बिन्नी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)