फिजिकल टेस्टच्या नावाखाली महिला खेळाडूंना कपडे काढण्यास सांगितले; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 09:36 PM2021-07-19T21:36:51+5:302021-07-19T21:37:09+5:30
विरोध करणाऱ्या खेळाडूला मैदानाबाहेर बसवण्याची धमकी दिली जाते
छत्तीसगडचं रायगढ स्टेडियम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी काही खेळाडूंनी येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. रविवारी स्टेडियममध्ये बास्केटबॉलपटूंनीदिल्लीचे प्रशिक्षक व महिला प्रशिक्षकांवर गंभीर आरोप केले आहे. अल्पवयीन मुलींनी आपल्या कुटुंबीयांसोबत पोलीस चौकीत जात दोन्ही प्रशिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुलींच्या नातेवाईकांनी सांगितले की, एनआयए दिल्लीचे प्रशिक्षक फिजिकल टेस्टसाठी मुलींना कपडे काढायला सांगतात. यासाठी महिला प्रशिक्षकही त्यांना साथ देते आणि विरोध करणाऱ्या खेळाडूला मैदानाबाहेर बसवण्याची धमकी दिली जाते. अनेक महिन्यांपासून हे सर्व सुरू आहे. अखेरीस मुलींनी वैतागून आम्हाला हे सर्व सांगितले. त्यानंतर आम्ही पोलीस चौकीत तक्रार दाखल केली.''
महिला पोलीस सेलच्या प्रभारी मंजू मिश्रा यांनी सांगितले की, दोन मुलांच्या कुटुंबीयांकडून प्रशिक्षकाविरोधात लेखी तक्रार मिळाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली असून तपास सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.