भारताकडून चिली पराभूत
By admin | Published: April 11, 2017 04:08 AM2017-04-11T04:08:51+5:302017-04-11T04:08:51+5:30
भारताने रंगतदार अंतिम लढतीत शूटआऊटमध्ये चिलीचा पराभव करीत महिला हॉकी विश्व लीगच्या दुसऱ्या टप्प्यात जेतेपद पटकावले आणि विश्व
वेस्ट वँकुवर : भारताने रंगतदार अंतिम लढतीत शूटआऊटमध्ये चिलीचा पराभव करीत महिला हॉकी विश्व लीगच्या दुसऱ्या टप्प्यात जेतेपद पटकावले आणि विश्व लीग सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली.
रविवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत उभय संघ निर्धारित वेळेत १-१ने बरोबरीत होते. निकालाची कोंडी फोडण्यासाठी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. शूटआऊटमध्ये भारतीय गोलकिपर सविताने चमकदार कामगिरी करीत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सविता स्पर्धेतील सर्वोत्तम गोलकिपर ठरली. सविताने शानदार कामगिरी करताना किम जॅकब व जोसेफा विलालाबेतिया यांना गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. कर्णधार राणी व मोनिका यांनी गोल नोंदवित भारताला शूटआऊटमध्ये २-० अशी आघाडी मिळवून दिली.
चिलीच्या कॅरोलिना गार्सियाने तिसऱ्या प्रयत्नात गोल नोंदवला, पण दीपिकाने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित भारताला विजय मिळवून दिला. पाचव्या मिनिटाला मारिया माल्दोनाडोने चिलीतर्फे गोलचे खाते उघडले. सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतरही भारतीय महिला संघाने आशा कायम राखल्या. भारतीय खेळाडूंनी अभेद्य बचाव करीत चिलीला गोल नोंदवण्याची पुन्हा संधी दिली नाही. २२व्या मिनिटाला भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण चिलीची गोलकिपर क्लाडिया शुलरने शानदार बचाव केला. चिलीने तिसऱ्या क्वार्टरपर्यंत आघाडी कायम राखली होती. त्यानंतर अनुपा बार्लाने ४१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाला बरोबरी साधून दिली.
चौथ्या क्वार्टरमध्ये उभय संघांनी जोरकस प्रयत्न केले. भारतीय स्ट्रायकर राणीला सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवण्याची संधी होती, पण क्लाडियाने तिचे आक्रमण परतावून लावले.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय कर्णधार राणी म्हणाली, ‘‘ही चुरशीची लढत होती आणि आम्ही आपल्या कामगिरीवर समाधानी आहोत. चिलीचा संघ मजबूत असून, त्यांना पराभूत करणे कठीण होते. चिलीने सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर आम्हाला मनोधैर्य कायम राखावे लागले. आमच्यासाठी ही खडतर स्पर्धा होती. वातावरण आव्हानात्मक होते. कारण काही दिवसांपूर्वी येथे पाऊस आला होता. दुसऱ्या टप्प्यात जेतेपद पटकावल्यामुळे आनंद झाला. या कामगिरीच्या आधारावर आम्हाला विश्व लीग उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवता आली.’’ (वृत्तसंस्था)
दीपिकाचे लढतींचे द्विशतक
भारताची आघाडीची खेळाडू दीपिका ठाकूरने सोमवारी स्पेनविरुद्ध खेळताना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० सामने पूर्ण केले. तिने या लढतींमध्ये एकूण २५ गोल नोंदवले. ती गतवर्षी रियो आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात होती. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने २०१६मध्ये ध्रुव बत्रा प्लेअर आॅफ इयर हा पुरस्कारा जिंकला होता. २०१६च्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ती टॉप स्कोअरर होती.