चीन ओपन बॅडमिंटन; सिंधूचा सलामीला धक्कादायक पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 05:07 AM2019-11-06T05:07:54+5:302019-11-06T05:08:43+5:30
४२ व्या स्थानावरील पाइ यूकडून विश्वविजेती ७४ मिनिटात गारद
फुलोऊ (चीन) : विश्व चॅम्पियन पी.व्ही. सिंधू हिला मंगळवारी येथे सुरू झालेल्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत ४२ व्या स्थानावर असलेली चायनीज तैपईची पाइ यू हिच्याकडून अवघ्या ७४ मिनिटात सिंधू १३-२१, २१-१८,१९-२१ अशी पराभूत झाली. सहाव्या स्थानावर असलेली सिंधू याआधी डेन्मार्क आणि कोरिया येथील स्पर्धेतही सलामीला पराभूत झाली होती. पाइ यूविरुद्ध चार सामन्यात सिंधूचा हा पहिला पराभव ठरला. सिंधूने पहिला गेम गमविल्यानंतरही दुसरा गेम जिंकून चुरस वाढविली होती. निर्णायक गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूने सुरुवातीला ८-२ अशी आघाडी मिळविली होती.अनुभवी सिंधूने सलग नऊ गुण संपादन केले पण पाय यू १५-१२ अशी आघाडी कमी करण्यात यशस्वी ठरली. सिंधूला अखेरच्या टप्प्यात सूर न गवसल्याने सामनाही गमवावा लागला.
दुसरीकडे, सात्त्विक साईराज रंकीरेड्डी याने मात्र पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत विजय संपादन केले. मागच्या महिन्यात फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठणारे सात्त्विक आणि चिराग यांनी फिलिप च्यू आणि रेया च्यू यांच्यावर २१-९, २१-१५ ने विजय नोंदविला. त्याआधी सात्त्विक आणि अश्विनी पोनप्पा यांनी मिश्र प्रकारात कॅनडाचे जोशुआ हर्लबर्ट यू- जोसेफिन वू यांचा २१-१९,२१-१९ ने पराभव करीत दुसऱ्या फेरीत धडक दिली. (वृत्तसंस्था)
प्रणॉयचाही पराभव
पुरुष एकेरीत डेंग्यूच्या आजारातून सावरलेला एच. एस. प्रणॉय हा देखील पहिल्या फेरीत डेन्मार्कचा रासमुस गस्के याच्याकडून १७-२१, १८-२१ ने पराभूत झाला. अश्विनी- एन. सिक्की रेड्डी यांना महिली दुहेरीत ३० मिनिटात ली वेन- झेंग वू यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.