चायना ओपन बॅडमिंटन: पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:54 PM2019-09-19T23:54:36+5:302019-09-19T23:54:54+5:30
सात्त्विक दुहेरीच्या दोन्ही सामन्यात पराभूत
चांग्झू(चीन) : विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधू हिचे चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले
आहे. गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व लढतीत सिंधूला थायलंडची पोर्नपावी चोचुवोंगविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक संघर्षात पराभव पत्करावा लागला. आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूने पहिला गेम जिंकल्यानंतरही ५८ मिनिटात पोर्नपावीकडून २१-१२, १३-२१, १९-२१ ने पराभूत व्हावे लागले.
सिंधूचा पोर्नपावाविरुद्ध चार सामन्यात हा पहिला पराभव होता. सामन्यात तिने चांगली सुरुवात करीत ब्रेकपर्यंत थायलंडच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध १९-१० ने गेम जिंकला. दुसऱ्या आणि तिसºया गेममध्ये सिंधू लय कायम राखू शकली नाही. अखेरच्या गेममध्ये सलग सहा गुणांची कमाई करीत पोर्नपावीने गेम आणि सामना जिंकला.
दुहेरी गटात सात्त्विक साईराज रंकीरेड्डी हा पुरुष आणि मिश्र दुहेरीत पराभूत झाला. पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेल सात्त्विक- चिराग शेट्टी हे जपानचे चौथे मानांकित ताकेशी कामुरा- केइगो सोनोदा यांच्याकडून ३३ मिनिटात १९-२१, ८-२१ ने पराभूत झाले. याआधी जुलै महिन्यात जपान ओपनदरम्यानही भारतीय जोडीला याच जोडीकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. यानंतर मिश्र दुहेरीतही अश्वनी पोनप्पासोबत खेळणारा सात्त्विक यूकी केनेको आणि मिसाकी मात्सुतोमो या जपानच्या जोडीकडून ११-२१, २१-१६, १२-२१ ने पराभूत झाला.