पदक स्वीकारताना चिनी, पाकिस्तानी खेळाडूंकडे लक्ष नव्हते - नीरज चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 12:06 AM2018-09-06T00:06:57+5:302018-09-06T00:07:18+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेच भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी त्याच्यासमवेत पाकिस्तान व चीनचा खेळाडू पोडीयमवर होता.
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी त्याच्यासमवेत पाकिस्तान व चीनचा खेळाडू पोडीयमवर होता. मात्र, यावेळी पदक स्वीकारल्यानंतर भारताच्या राष्ट्रगीत धूनमध्ये तल्लीन झाल्याने त्याने या दोन्ही खेळाडूंकडे लक्ष दिले नाही.
या स्पर्धेत चोप्राने सुवर्णपदक, चीनच्या लियू किझेन याने रौप्य तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने कास्यपदक पटकावले होते. चोप्राने नदीम याच्याशी केलेल्या हस्तांदोलनाच्या छायाचित्राची नंतर खूप चर्चा झाली. सानिया मिर्झानेही यावर ट्विट करत ‘खेळाद्वारे आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो ’असे म्हटले होते.
झेक प्रजासत्ताक येथे सराव करणारा चोप्रा म्हणाला,‘मी कोणाबरोबर उभा आहे ,याकडे माझे लक्ष नव्हते. माझे सगळे लक्ष राष्टÑगीताकडे होते. राष्टÑगीताबरोबर वर जाणाऱ्या तिरंग्याला पाहून मी माझी मेहनत व संघर्ष आठवत होतो.’
चोप्राच्या मेसेजच्या प्रतीक्षेत पाकिस्तानी खेळाडू
पाकिस्तानी खेळाडू नदीमने मात्र आपल्या मेसेजला चोप्रा उत्तर देत नसल्याचा दावा केला आहे. नदीम चोप्राच्या कामगिरीने खूप प्रभावित असून त्याच्यासारखीच कामगिरी करण्याचे स्वप्न नदीमचे आहे. याविषयी विचारले असता चोप्रा म्हणाला, ‘मला याबाबत माहित नाही. त्याने मेसेज पाठवला असेल. मात्र मी जास्त मेसेज पहात नाही.’