चोकर्स पुन्हा बनले जोकर!!!

By Admin | Published: June 12, 2017 03:21 AM2017-06-12T03:21:06+5:302017-06-12T04:14:19+5:30

महत्त्वाच्या लढतीत ढेपाळण्याच्या वृत्तीमुळे चोकर्सचा शिक्का बसलेला हा संघ आज पुन्हा आपल्या नावाला जागला.

Chokaro becomes Joker again !!! | चोकर्स पुन्हा बनले जोकर!!!

चोकर्स पुन्हा बनले जोकर!!!

googlenewsNext

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत

चांगली सवय लागायला वेळ लागतो, पण वाईट खोडी मात्र सुटता सुटत नाहीत. काहीशी अशीच अवस्था झाली आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाची. महत्त्वाच्या लढतीत ढेपाळण्याच्या वृत्तीमुळे चोकर्सचा शिक्का बसलेला हा संघ आज पुन्हा आपल्या नावाला जागला. त्याचाच फायदा उठवत विराट कोहलीच्या भारतीय संघाने अगदी करो वा मरो अशी स्थिती असलेल्या लढतीत या चोकर्सना पुन्हा एकदा जोकर बनवले.

श्रीलंकेकडून मार खाल्ल्यानंतर भारतासाठी ही लढत काहीशी कठीण मानली जात होती. त्याला कारणही तसेच होते म्हणा, एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला दक्षिण आफ्रिकचा संघ भारतीय संघापेक्षा कांकणभर सरस भासत होता. त्यामुळे ते भारतीय संघाची विकेट तर काढणार नाहीत ना? अशी भीती भारतीय क्रिकेटप्रेमींना राहून राहून वाटत होती. पण प्रत्यक्षात शत्रूला बलाढ्य समजून मोठ्या तयारीनिशी मोहिमेवर जावे आणि शत्रूने पहिल्या प्रहराच हार मानून पांढरे निशाण फडकवावे, तसे पांढरे निशाण दक्षिण आफ्रिकेने विराटसेनेसमोर फडकवले.

आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!


तसे ते महत्त्वाच्या लढतीत कोलमडण्यासाठी कुप्रसिद्ध आहेतच. त्यांच्या या दुर्गुणाचा आपणही अनेकदा फायदा उचललाय. आजही तेच केले. नाणेफेकीचा कौल आपल्यासाठी शुभशकून ठरला. मग आपली गोलंदाजी पुन्हा बहरली. सलामीलाच पाकिस्तानचे शिरकाण केल्यानंतर लंकेविरुद्ध मात्र गोलंदाज मंडळी थंडावल्यासारखी वाटली. पण आफ्रिकेविरुद्ध मात्र गोलंदाजीत पुन्हा आग दिसली. कमाल म्हणजे आज आपले क्षेत्ररक्षण जबरदस्त झाले. एवढे जबरदस्त की समोरचे आफ्रिकन फलंदाज गोंधळले. अगदी अमला, डीकॉक, डीव्हिलियर्स, मिलर, दुमिनी, मॉरिस असे फर्डे फटकेबाज दिमतीला असतानाही. आपल्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी कामगिरी चोख बजावली. त्यांच्या चक्रव्यूहात आफ्रिकी फलंदाज अलगद अडकले, अडखळले आणि भांबावलेल्या अवस्थेत बाद झाले.

आणखी वाचा - "धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड

बाकी 192 ही काय आपल्यासाठी अवघड बाब नव्हती. गोलंदाजांनी आधीच बुरुजांना सुरुंग लावल्याने फार हानी न होता आफ्रिकन किल्यावर निशाण फडकवण्याचे काम फलंदाजांवर होते. धवन आणि कोहलीने ते अगदी आरामात पार पाडले. आता उपांत्य फेरीत आपली गाठ बांगलादेशशी पडण्याची शक्यता आहे. स्पर्धेत काहीशा नशिबवान ठरलेल्या बांगलादेशपेक्षा विराटसेना नक्कीच उजवी आहे. पण आपल्याला गाफील राहणे परवडणार नाही.

Web Title: Chokaro becomes Joker again !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.